आ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून महिलांना एकविरा देवी दर्शन
नवी मुंबई : नवसाला पावणारी एकविरा देवी, कोळ्यांचे आराध्य दैवत, हिंदू समाजात एक विशेष स्थान राखते. कार्ला लेण्यांच्या नजिक स्थित एकविरा देवीने अनेक भक्तांची मनं जिंकली आहेत. त्याअनुषंगाने आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून २९ सप्टेंबर रोजी नवी मुंबई मधील महिलांनी एकविरा देवी दर्शनाचा लाभ घेतला.
एकविरा देवी दर्शनासाठी कोणतीही जाहिरात नसतानाही हजारो महिलांनी नाव-नोंदणी केली. त्यामुळे अधिक संख्येने नोंदणी केलेल्या महिलांपैकी शेकडो महिलांना २९ सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्यात एकविरा दर्शन घडविले असून उर्वरित महिलांना देखील टप्प्याटप्प्याने एकविरा देवी दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
एकविरा आईच्या दर्शनाने महिलांचे दुःख दूर होईल आणि त्यांना नवी ऊर्जा मिळणार आहे. तसेच एकविरा देवी ठिकाणी सहभागी महिलांना प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे थांबवून कापडी पिशव्या स्वीकारण्याचे आणि प्लास्टिकमुक्त नवी मुंबईच्या निश्चयामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी केले.
याप्रसंगी भरत जाधव, मकरंद म्हात्रे, संगीता म्हात्रे, सुमित्रा पवार, जयेश थोरवे, मुकुंद विश्वासराव, कुसुम बनसिलाल सेद यांच्यासारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.