‘नमुंमपा'च्या मीनाताई ठाकरे रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था
नवी मुंबई : ‘मनसे'ची परिवर्तन यात्रा ३० सप्टेंबर रोजी नेरूळ पूर्व मध्ये पोहोचली. यावेळी ‘मनसेे'चे प्रवक्ते तथा शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी महापालिकेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयास अचानक भेट दिली. यावेळी सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुरवस्था आढळून आली. सर्व औषधे महापालिकेने मोफत देणे असा नियम असताना अनेक रुग्णांना औषधे बाहेरुन आणायला डॉक्टरांनी सांगितले जात आहे. यावेळी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उध्दव खिल्लारे यांना गजानन काळे यांनी धारेवर धरले. ज्या ब्रँडची औषधे रुग्णालयाच्या मेडिकल मध्ये नाहीत, त्या ब्रँडची औषधे डॉवटर रुग्णांना लिहून देत असल्याचे आढळले. जी औषधे रुग्णालयात उपलब्ध आहेत, ती औषधे डॉवटर का लिहून देत नाहीत? असा सवाल काळे यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. खिल्लारे यांना विचारला.
रुग्णालयात असणारी एकमेव सोनोग्राफी मशीन बंद असल्याचे दिसून आले. यामुळे काही रुग्ण खोळंबून होते. त्यांना उपाय म्हणून महापालिकेच्या दुसऱ्या रुग्णालयात का पाठवले नाही? असा प्रश्न गजानन काळे यांनी उपस्थित केला. त्याचप्रमाणे एक डॉक्टर जेवणाची वेळ संपून एक तास झाले तरी रुग्णालयात उपलब्ध नव्हते. त्यामुळे रुग्णांचे हाल झालेले निदर्शनास आले. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर १५० ते २०० गरोदर महिला उपचारासाठी वाट बघत होत्या. परंतु, फक्त २ स्त्री रोग तज्ञ या महिलांना तपासात असताना बघून नवी मुंबईतील आरोग्य व्यवस्था किती वाईट आहे, याचे उदाहरण दिसून आले. जर महापालिका रुग्णालयांमध्ये तज्ञ डॉक्टर, नर्स यांची भरती करु शकत नसेल, तर प्रशासन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे खोटे स्वप्न का दाखवत आहे? असा सवालही गजानन काळे यांनी उपस्थित केला. या सर्व प्रश्नांसंदर्भात गजानन काळे यांनी नवी मुंबई महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त सुनिल पवार यांना फोन करुन या बाबतीत जाब विचारला.
महापालिकेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयातील सदर भेटीत गजानन काळे यांच्या सोबत ‘मनसेे'चे शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सहसचिव अभिजीत देसाई, विभाग अध्यक्ष उमेश गायकवाड, निखील गावडे, अक्षय भोसले, विशाल चव्हाण, विभाग सचिव निलेश सैंदाणे, उपविभाग अध्यक्ष अमोल दहिफळे, शाखा अध्यक्ष प्रणित डोंगरे, गणेश पाटील, जालिंदर पवार, चेतन कराळे तसेच मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सैनिक, नागरिक उपस्थित होते.