शिंदे गटाच्या असहकार्यामुळेच भिवंडी मध्ये ‘भाजपा'चा पराभव -नरेंद्र पवार
कल्याण : देशात आणि राज्यात, भारतीय जनता पक्ष कायम आपल्या सहकारी पक्षांना बरोबर घेऊन काम करीत आहे. भाऊ छोटा असू दे किंवा मोठा त्याने भावासारखे वागले पाहिजे, हीच भूमिका आमची ‘महायुती'मध्ये आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक महत्वपूर्ण योजना शेवटच्या गरजू माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम गेली १० वर्षांपासून करीत आहे. जनतेसाठी कायम कार्यरत राहणे माझ्यावरील संस्कार आहे. यात बंडखोरीचा विषय आला कुठे? ज्यांनी खंजीर खुपसण्याची भाषा केली, त्यांनी भिवंडी लोकसभा निवडणुकीत ‘भाजपा'चा पराभव करण्यासाठी काम करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीत खंजीर खुपसला, असे प्रत्युत्तर माजी आमदार नरेंद्र पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिले.
‘शिवसेना शिंदे गट'चे भिवंडी जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या सामाजिक कार्यावर बोट ठेवत, बंडखोरीच्या आणि पाठीत खंजीर खुपसण्याविषयी केलेल्या विधानावर ते बोलत होते.
निवडणुका आल्या की काम, माझ्या सामाजिक आणि राजकीय कामाचे सूत्र नाही. सतत कार्यरत राहून सामाजिक आणि राजकीय प्रवास मी आजवर केला आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत जनतेने मला कल्याण पश्चिम विधानसभाचे नेतृत्व देऊन आमदार केले. त्या ५ वर्षाच्या कालावधीत मी अनेक विकास कामे केली. त्यानंतर सन २०१९ च्या निवडणुकीत जनता आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे अपक्ष निवडणुकीला सामोरे गेलो. त्यावेळी मला दुसऱ्या क्रमांकाची ४४ हजार मते मिळाली. निवडणुकीत पराभव झाला म्हणून मी काम करणे सोडले नाही. या उलट पराभव झाल्यानंतर लगेच तातडीने कामाला सुरुवात केली आणि आज देखील करतोय, असे नरेंद्र पवार म्हणाले.
लाडकी बहीण, महात्मा फुले आरोग्यदायी योजना, मुख्यमंत्री सहाय्यता योजना, आभा-आयुष्यमान आरोगी विमा योजना, मुद्रा योजना, कौशल्य विकास योजना, विश्वकर्मा योजना, एक दिवासीय दाखले वाटप, आधारकार्ड, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, वह्या वाटप, प्रश्नसंच वाटप, रस्ते विकास-चौक सुशोभीकरण आदि योजना आपण सक्षमपणे जनसंपर्क कार्यालयातून राबवत आहे. नागरिकांना देखील त्याचा लाभ मिळतोय याचा मला आनंद आहे, असे नरेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मी माझ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ‘महायुती'ची कामे जनते पर्यंत पोहोचवतोय किंवा काम करतोय यात काही गैर नाही. खासदारकीच्या निवडणुकीत भिवंडी लोकसभा क्षेत्रात या लोकांनीच ‘महायुती'मध्ये मिठाचा खडा टाकला. त्यांच्या असहकार्यामुळेच ‘भाजपा'ला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही, असे चोख प्रत्युत्तर माजी आमदार नरेंद्र पवार यांनी विरोधकांना दिले.