पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ५ ऑक्टोबर रोजी कासारवडवली येथे दौरा
ठाणे : ठाणे शहरात कासारवडवली येथील वालावलकर मैदान येथे होणाऱ्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ५ ऑक्टोबर २०२४ रोजी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी पूर्वतयारीची बैठक ३० सप्टेंबर रोजी ठाणे महापालिका मुख्यालय येथे झाली.
सुमारे ४० हजार नागरिकांची उपस्थिती या कार्यक्रमास अपेक्षित असून ठाणे तसेच आसपासच्या महापालिकांमधून सुमारे १२०० बसगाड्यांची ये-जा घोडबंदर रोड परिसरात होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सदर नियोजित दौरा ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या दौऱ्यासाठी आवश्यक सर्व व्यवस्थांचे नियोजन करण्यासाठी विविध जबाबदाऱ्यांची निश्चिती करण्यात आली आहे. त्यानुसार पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी ठाणे महापालिका मुख्यालय येथे बैठक झाली. सदर बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ‘महाराष्ट्र मेट्रो रेल महामंडळ'चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, ‘एमएमआरडीए'चे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, ‘सार्वजनिक बांधकाम विभाग'चे अधीक्षक अभियंता सिध्दार्थ तांबे, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, महापालिका उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (समाजविकास) अनघा कदम, उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी विकास गजरे, ठाणे प्रांताधिकारी उर्मिला पाटील, एमएमआरडीए, महामेट्रो अशा विविध महत्त्वाच्या विभाग, कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पावसाळ्याचे दिवस लक्षात घेवून मुख्य सभामंडप, पार्किंग व्यवस्था येथील सर्व नियोजन करण्यात यावे. त्याचबरोबर वीज पुरवठा, इंटरनेट सेवा यांची पर्यायी व्यवस्थाही उपलब्ध करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी यावेळी दिल्या. तसेच या काळात मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार असल्याने वाहतुकीसाठी बंद होणारे रस्ते, सेवा रस्त्यांच्या वापराची स्थिती आदिंबाबत नागरिकांना अवगत करण्यात यावे, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.
मुख्य सभामंडप, हेलिपॅड, गाड्या आणि बसेस पार्किंग व्यवस्था, वीज पुरवठा, सीसीटीव्ही नेटवर्क, जोड रस्ते यांच्या सद्यःस्थितीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. बसगाड्यांची पार्किंग व्यवस्था, अतिमहत्त्वाच्या व्यक्तीचे प्रवास मार्ग आदिंबाबत बैठकीत पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी सादरीकरण केले.
सुमारे १२०० बसगाड्यांच्या पार्किंगचे नियोजन महापालिकेच्या ‘सार्वजनिक बांधकाम विभाग'ने केले आहे. त्या जागा ताब्यात घेण्यात आल्या असून त्यांचे सपाटीकरण आदि कामे करण्यात येत असल्याची माहिती नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी दिली. तर मुख्य सभामंडप आणि हेलिपॅड यांच्या व्यवस्थेबाबत अधीक्षक अभियंता सिध्दार्थ तांबे यांनी माहिती दिली. सदर बैठकीनंतर उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळाचीही एकत्रित पाहणी केली.