'माझी वसुंधरा अभियान ४.०' अभियानात पनवेल महापालिका राज्यात पहिली

पनवेल :  माझी वसुंधरा अभियान ४.० या अभियानांतर्गत पनवेल महापालिकेने विविध उपक्रम राबवून केलेल्या कष्टाचे फळ महापालिकेस मिळाले आहे. नुकताच 'माझी वसुंधरा ४.० अभियानाचा निकाल  जाहीर झाला असून, निकालानुसार राज्यातील ३ ते १० लाख लोकसंख्येच्या गटामध्ये पहिला क्रमांक पटकावला असून यामध्ये सात कोटी बक्षीसाची रक्कम पालिकेस मिळणार आहे. या पुरस्काराने पनवेल महापालिकेच्या मुकुटात मानाचा तुरा रोवला गेला असल्याने समाजाच्या सर्व स्तरातून तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख तसेच विद्यमान आयुक्त मंगेश चितळे आणि पनवेल महापालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सर्व स्थरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित "माझी वसुंधरा अभियान" हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक २ ऑक्टोबर, २०२० राबविण्यास सुरवात झाली. "माझी वसुंधरा अभियान ४.०" हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक १ एप्रिल, २०२३ ते दिनांक ३१ मे, २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये राज्यातील ४१४ नागरी स्थानिक संस्था व २२,२१८ ग्राम पंचायती अशा एकूण २२,६३२ स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता.

माझी वसुंधरा ४.0 अंतर्गत पर्यावरण विभागामार्फत नागरिकांमध्ये पर्यावरण बद्दल जनजागृती करण्याच्या दृष्टीने  गेल्यावर्षभरापासून पर्यावरण विभागाचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम राबविले. यामध्ये प्रामुख्याने महानगरपालिका क्षेत्रामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी माझी वसुंधरा ४.० अंतर्गत महापालिकेच्या वतीने यावर्षीप्रमाणे मागील वर्षीही  'बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा' मोहिम हाती घेतली होती. या स्पर्धेला पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला.

माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पर्यावरणाचे महत्व शालेय विद्यार्थ्यांना समजावे यासाठी 'पर्यावरण सेवा योजना' महापालिकेच्यावतीने पालिका कार्यक्षेत्रातील माध्यमिक विद्यालयांमध्ये राबविण्यात येत आहे. या पर्यावरण सेवा योजनांतर्गत आकाश, जल, वायू, भूमी, अग्नि या माझी वसुंधरा अभियानातील महत्वाच्या घटकांनुसार पर्यावरण रॅली,पर्यावरण विषयक कार्यशाळा, व्याख्याने, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, वृक्षारोपण, प्रश्नमंजूषांचे आयोजन विद्यालयांमध्ये करण्यात आले होते. याचबरोबर मॅरेथॉन, स्वच्छता रॅली,सायकल रॅली घेण्यात आली होती.

माझी वसुंधरा अभियानतील महत्वाच्या घटकांना अनुसरून महापालिकेने पालिका क्षेत्रात १०० टक्के एलईडी पथदिवे लावले आहेत. वायूमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिकेने विशेष प्रयत्न करत असून यासाठी  धूळ शमन वाहन (मल्टिपर्पज डस्ट सप्रेशन व्हेईकल) खरेदी केले आहे. तसेच विविध इमारतींवर सोलार पॅनेल बसवून पालिकेने  विजेचे बिल कमी केले आहे.

महापालिकेचा पर्यावरण विभाग करत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल शासनाने हा पुरस्कार महापालिकेस देऊ केला असून आयुक्त मंगेश चितळे यांनी पर्यावरण विभागाच्या टिमचे कौतुक करून येत्या काळात पर्यावरण विषयक विविध कार्यक्रम राबविण्यावर भर देण्याबाबत सुचविले आहे.

निसर्गाच्या पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश पंचतत्वासोबत जीवन पद्धती अंगीकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही आणि जैव विविधतेचेही अस्तित्व राहणार नाही. म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना सोबत घेऊन तेथे या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिण्यासाठी 'माझी वसुंधरा हे अभियान राबविण्यात येत आहे.- उपायुक्त डॉ. वैभव विधाते, पर्यावरण विभाग

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ॲडव्होकेट ॲकॅडमी-संशोधन केंद्र न्यायसंस्थेसाठी ठरणार मानचिन्ह -न्यायमूर्ती भूषण गवई