‘प्लास्टिकमुक्त नवी मुंबई'चा निर्धार!
नवी मुंबई : प्लास्टिकमुळे पर्यावरणाला होणारा धोका लक्षात घेऊन एकल वापर प्लास्टिक आपल्या दैनंदिन वापरातून हद्दपार करायला हवे यादृष्टीने प्लास्टीकमुक्त शाळा अशी संकल्पना महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता ही सेवा पंधरवडा निमित्त प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
या अनुषंगाने शालेय स्तरावर प्लास्टीक बॉटल्सपासून शोभिवंत वस्तू बनविण्याच्या अभिनव उपक्रमाचे आयोजन नमुंमपा शिक्षण विभागाच्या वतीने शालेय स्तरावर करण्यात आले होते. यामध्ये महापालिकेच्या ५७ प्राथमिक, २३ माध्यमिक शाळांप्रमाणेच खाजगी ३३३ शाळांतील १ लाख ५७० विद्यार्थ्यांनी सहभागी होत प्लास्टिकच्या बाटल्यांपासून शोभिवंत वस्तू तयार केल्या. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी स्वहस्ते बनविलेल्या वस्तुंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी पालकही विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते.
सदर उपक्रमामधून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला मुक्त वाव मिळाल्याचे अनुभवता आले. प्लास्टीक बॉटल्सपासून विद्यार्थ्यांनी पेन होल्डर, फुलदाण्या, गृहसजावटीच्या नानाविध वस्तू, फुले असे विविध अविष्कार घडविले. प्रदर्शनात मांडलेल्या शोभिवंत वस्तुंमधील वैविध्य विद्यार्थ्यांच्या कुशलतेचे कौतुक करण्यासारखे होते.
स्वच्छतेचा संस्कार विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शालेय पातळीवरील नानाविध उपक्रमांना खाजगी शाळा व्यवस्थापनांचेही चांगले सहकार्य मिळत असून विद्यार्थ्यांमध्येही एक प्रकारचा उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे १ लाखाहुन अधिक विद्यार्थ्यांनी या टाकाऊपासून शोभिवंत वस्तू तयार करण्याच्या अभिनव उपक्रमात सहभागी होत जणू ‘प्लास्टिकमुक्त नवी मुंबई'चा निर्धारच व्यक्त केला.