मैदानात वाढलेल्या गवतामुळे साप, विंचू यापासून धोका
खारघर : खारघर, सेक्टर-१६ मधील खेळाच्या मैदानात उभारण्यात आलेल्या जिमच्या साहित्यासभोवती पाण्याचे डबके साचले असून मैदान गवंताने वेढलेले आहे. वाढलेल्या गवतामध्ये साप, विंचू यासारख्या विषारी प्राण्यांमुळे लहान मुलांच्या जीवितास धोका असून पनवेल महापालिका प्रशासनाने मैदानातील गवत काढून परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी करणारे पत्र ‘शिवसेना-उबाठा गट'चे खारघर उपशहरप्रमुख नंदू वारुंगसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांना दिले आहे.
खारघर, सेक्टर-१६ केपीसी शाळेसमोर ‘सिडको'ने ५४७८ चौरस मीटर क्षेत्रफळ जागेवर खेळाचे मैदान विकसित केले होते. पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यांनतर सदर उद्यान महापालिकेकडे हस्तांतरण झाले आहे. मैदानात परिसरातील नागरिक आणि मुलांना व्यायाम करता यावे यासाठी जिमचे साहित्य बसविण्यात आले आहे. जिमच्या चारही बाजुने पाण्याचे डबके साचले साचल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच या मैदानात मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे. सदर परिसर खाडीकिनारा असल्यामुळे साप, विंचू यामुळे येथे खेळण्यास येणाऱ्या लहान मुलांच्या जीवास धोका असल्यामुळे पालक आणि मुलांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने मैदानाची स्वच्छता करुन मुलांना खेळता यावे असे उद्यान मुलांना उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी ‘शिवसेना'चे खारघर उपशहर प्रमुख नंदू वारुंगसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त चितळे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
शाळेच्या सुट्टीत तसेच सुट्टीच्या दिवशी मुलांनी मोबाईल खेळापासून दूर राहून मैदानात विविध खेळ खेळावे, असे पालकांना वाटते. मात्र, सेक्टर-१६ मधील मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून गवत वाढल्यामुळे खेळण्यासाठी जागा नसल्यामुळे मुले मोबाईलचा आसरा घेतात. महापालिकेने तातडीने मैदानातील गवत काढून स्वच्छ करुन दिल्यास मुले विविध खेळ खेळू शकतील. - नंदू वारुंगसे, उपशहरप्रमुख, शिवसेना (उबाठा), खारघर.
महापालिका कर्मचाऱ्यांना पाठवून मैदानाची माहिती घेवून पुढील उपाययोजना केली जाईल. - प्रसंजीत कुर्लेकर, उपायुक्त-पनवेल महापालिका.