अंबरनाथ येथे आढळले दुर्मिळ पिसोरी हरीण
कल्याण : हरीणाच्या प्रजाती मधील पिसोरी हरीण (मुषक हरीण) आढळणे दुर्मिळ असून अंबरनाथ एमआयडीसी लगतच्या परिसरात जखमी अवस्थेत सापडलेल्या पिसोरी हरीणाला वॉर या वन्यजीव रेसक्यू टीम सदस्य, वन परिमंडळ अधिकारी यांनी प्रथोमपचार केले. यानंतर या पिसोरी हरणास पुढील उपचारासाठी वन परिक्षेत्र अधिकारी संजय चन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे रवाना करण्यात आले.
अंबरनाथ एमआयडीसी मधील रिलायन्स स्टील ट्युब्स या कंपनीस लागून असलेल्या जंगल परिसरात अतंत्य दुर्मिळ पिसोरी जातीचे हरीण जखमी अवस्थेत आढळले. स्थानिक वनाधिकारी वैभव वाळिंबे यांनी त्यास ताब्यात घेऊन त्यावर पशुवैद्यांच्या मदतीने प्रथमोपचार करुन त्याला जीवदान दिलेले आहे.
अंबरनाथ अतिरिक्त एमआयडीसी परिसरास लागून माथेरान मलंगगड मधून आलेली डोंगररांग असून त्यावर विस्तीर्ण असे वनक्षेत्र आहे. सदर जंगल परिसरात बिबट्या, हरीण, भेकर, माकड, रानडुक्कर, ससे, साप, विविध पक्षी अशा अनेक प्रकारच्या वन्यजीवांचा वावर आहे. २२ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास रिलायन्स स्टील ट्युब कारखान्यात रात्रपाळीवर असणाऱ्या कामगाराला लगतच असलेल्या डोंगराजवळ जखमी झालेला हरीण सारखा प्राणी निदर्शनास आला. त्याने तात्काळ स्थानिक प्राणीमित्र विनय पवार आणि वन विभागाशी संपर्क करुन त्याबाबत कळविले. यानंतर वन परिमंडळ अधिकारी वैभव वाळिंबे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वॉर या वन्यजीव रेसक्यू टीमच्या मदतीने सदर दुर्मिळ पिसोरी हरीण सुरक्षितरित्या रेस्क्यू केले. यावेळी या हरणाची प्राथमिक पाहणी केली असता ते जखमी असल्याचे निदर्शनास आल्याने त्यास पशुवैद्य डॉ .रायबोळे यांच्या मदतीने प्रथमोपचार करण्यात आले. यानंतर या हरणाला पुढील उपचारासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय चन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान - बोरीवली येथे रवाना करण्यात आले आले.
दरम्यान, सदर हरणावर तज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीखाली पुढील उपचार करणार असून त्याच्यावर जखमा कशामुळे झाल्या ते डॉक्टरांकडून वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर कळेल, असे वन परिक्षेत्र अधिकारी संजय चन्ने यांनी सांगितले.