खाडीकिनारी संरक्षक भिंत बांधण्यास वाशी ग्रामस्थांचा पुन्हा विरोध
नवी मुंबई : वन विभाग अंतर्गत कांदळवन विभागाच्या वतीने वाशीगांव खाडीकिनाऱ्यालगत पुन्हा एकदा पोलीस संरक्षणात संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरु आहे. या संरक्षक भिंतीला वाशीगांव ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. तसेच वाशी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने वाशीगांव ग्रामस्थांनी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या नेतृत्वात आमदार गणेश नाईक यांची भेट घेऊन संरक्षक भिंतीचे काम थांबविण्याची त्यांना विनंती केली.
दरम्यान, वन खात्याच्या कांदळवन विभागान यापूर्वी ऑगस्ट २०२२ मध्ये वाशीगांवच्या मागील बाजुस नाखवा सिताराम भगत सी-बीच रस्त्यालगत खाडीकिनाऱ्यावर संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरु केले होते. त्यावेळी वाशी ग्रामस्थांनी या भिंतीच्या कामास प्रखर विरोध केल्याने सदरचे काम अर्धवट सोडण्यात आले होते. पण, आता २३ सप्टेंबर रोजी पुन्हा कांदळवन विभागाने पोलीस बंदोबस्तात संरक्षक भिंतीच्या कामाला सुरुवात केल्याने वाशी ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झाला.
त्यामुळे वाशी ग्रामस्थांनी दशरथ भगत यांच्या नेतृत्वात तात्काळ आ. गणेश नाईक यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडून भिंतीचे काम थांबविण्यासठी निवेदन दिले. आमदार नाईक यांनी यापूर्वी राज्याचे वनमंत्री पद भूषविलेले असल्याने त्या पदाचा अनुभव लक्षात घेत तातडीने ठाणे जिल्हा कांदळवन विभाग, महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क साधून समन्वयक बैठक घेतली. वाशीगांव ग्रामस्थ समुद्र-सामुद्रिक नैसर्गिक संपत्ती यांचे पारंपारिक नाते असून त्यावर गदा आणू नका. त्याठिकाणी ग्रामस्थ कोणतेही रहिवासीय अतिक्रमण करीत नसल्याने अनावश्यक संरक्षक भिंत उभारु नका, असे आ. गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच जर कांदळवन विभागाने वाशी गांव खाडीकिनाऱ्यावर संरक्षक भिंत उभारण्याचा प्रयत्न केल्यास ती भिंत पाडण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊ, असे वाशी ग्रामस्थांना आश्वासन दिले.
यावेळी युवा नेते निशांत भगत, समाजसेवक संदीप नाईक देखील उपस्थित होते.