वाशीमध्ये ‘बॉयलर इंडिया प्रदर्शन' सुरु
नवी मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभाग अंतर्गत असलेल्या ‘बाष्पके संचालनालय'च्या वतीने आयोजित जागतिक स्तरावरील बॉयरल इंडिया-२०२४ प्रदर्शन, चर्चासत्र आणि कार्यशाळेचे उद्घाटन २५ सप्टेंबर रोजी कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल यांच्या हस्ते झाले.
वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्र येथे तीन दिवस बॉयलर इंडिया प्रदर्शन, चर्चासत्र भरविण्यात आले आहे. यावेळी मुंबई नौदल प्रकल्पचे महासंचालक व्हाईस ॲडमिरल आर. स्वामीनाथन, कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड, ‘केंद्रीय बाष्पके मंडळ नवी दिल्ली'चे तांत्रिक सल्लागार संदीप कुंभार, आयसीटी मुंबईचे प्राध्यापक जी. डी. यादव, ‘फोर्ब्स मार्शल'चे संचालक तथा मुख्य ऑपरेशन अधिकारी दत्ता कुवळेकर, ‘ऑर्गेन्जबीक टेक्नॉजीस्'चे व्यवस्थापकीय संचालक भानू राजगोपालन, ‘बाष्पके संचालनालय'चे संचालक धवल अंतापूरकर, आदि यावेळी उपस्थित होते.
२७ सप्टेंबर पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात इटली, युके, जर्मनी, चीन, स्वीडन, बेल्जीयम, नेदरलँड या देशासह सुमारे २६० उद्योजकांनी सहभाग नोंदविला आहे. बाष्पके (बॉयलर) संबंधीत विविध यंत्रे, साहित्य यांची मांडणी येथे आहे. याशिवाय बाष्पके उद्योगातील नवनवीन तंत्रज्ञान, घडामोडी यांची माहिती होण्यासाठी चर्चासत्र आणि परिसंवादाचे आयोजन होणार आहे. या क्षेत्रातील तज्ञ यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी बॉयलर मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट सॉपटवेअर या प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले. बीएमएमएस प्रणालीमुळे बाष्पके उद्योगांमध्ये बाष्पक आणि त्याच्या सुट्या भागाच्या निर्मितीची प्रक्रिया जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होणार आहे. बीएमएमएस सॉपटवेअरच्या मदतीने आता उत्पादनातील प्रत्येक टप्प्याचे संपूर्ण दस्तऐवजीकरण एका प्लॅटफॉर्मवर सहजपणे करण्यात येईल, ज्यामुळे उत्पादक आणि नियामक यांच्यातील समन्वय अधिक चांगला होईल. बीएमएमएस सॉपटवेअरमुळे बॉयलर निर्मितीच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल आणि संबंधित कागदपत्रांमध्ये सुलभता येईल. ेसदर सॉपटवेअर केवळ औद्योगिक कार्यक्षमता वाढवणार नाही, तर कामगारांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण ठरेल.
बाष्पकांचा सुरक्षित आणि कार्यक्षम वापर कसा करावा, बाष्पक, हीट एक्सचेन्जर, प्रेशर व्हेसल्स निर्मितीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान कसे वापरावे, बाष्पके (बॉयलर) क्षेत्रात होणारे बदल, या क्षेत्रासंबंधीची माहिती प्रदर्शन, चर्चासत्र आणि कार्यशाळेच्या माध्यामातून कौशल्य विकास आणि रोजगारांची संधी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सदर प्रदर्शन उपयुक्त ठरत आहे.
उद्घाटन कार्यक्रमात प्रधान सचिव विनिता वेद सिंघल यांनी प्रदर्शन-चर्चासत्राच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. संचालक धवल अंतापूरकर यांनी प्रास्ताविकातून बाष्पके संचालनालयाची माहिती माहिती दिली. यावेळी उद्योग प्रतिनिधींनीही मनोगत व्यक्त केले.
उद्घाटन कार्यक्रमानंतर बाष्पके उद्योगाशी संबंधित विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. उद्योग क्षेत्रातील किरकोळ विक्रेते, व्यावसायिक, अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी यांची यावेळी गर्दी होती.