तळोजा वसाहतीला भेट देवून पाणी समस्या जाणून घेण्याची मागणी
खारघर : ऐन पावसाळ्यात तळोजा वासियांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी तळोजा वसाहतीला भेट देवून ‘सिडको'कडून पुरविल्या जाणाऱ्या पाणी पुरवठा विषयी माहिती घावी, अशी मागणी तळोजा वासियांकडून केली जात आहे.
‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी २३ रोजी ‘सिडको'च्या विविध पाणी पुरवठा योजनांच्या प्रकल्पस्थळांना भेट देऊन, ‘सिडको'कडून राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
दुसरीकडे ‘सिडको'ने विकसित केलेल्या तळोजा वसाहत मधील रहिवाशांना ऐन पावसाळ्यात टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. वसाहत मधील पाणी समस्या दूर व्हावी यासाठी ‘तळोजा फेडरेशन'कडून अनेकवेळा पत्रव्यवहार आणि आंदोलन करुनही ‘सिडको'कडून पाणी समस्येवर उपाययोजना केली जात नाही. ‘सिडको'च्या अधिकाऱ्यांना फोन केल्यास ते फोन उचलत नाही. टँकरची मागणी केल्यास तेही मिळत नसल्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.
‘सिडको'ने फेज-१ आणि २ मध्ये उभारलेले जलकुंभ केवळ देखावा म्हणून उभारले आहे. ‘सिडको'च्या गृहनिर्माण प्रकल्पामुळे तळोजा वसाहतीच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ असताना ‘सिडको'कडून पाणी विषयी कोणत्याही प्रकारचे नियोजन होताना दिसत नाही. त्यामुळे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी तळोजा वसाहतीला भेट देवून येथील पाणी समस्या विषयी नागरिकांचे मते जाणून घ्यावीत, अशी मागणी तळोजावासियांनी केली आहे.
तळोजा, सेक्टर-७ मध्ये आठवड्यापासून पाणी पुरवठा होत नाही. रहिवाशांना पाण्याविना गणेशोत्सव साजरा करावा लागला. पाणी समस्या संदर्भात ‘सिडको'च्या पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना संपर्क केल्यावर ते फोन उचलत नाही. त्यामुळे पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. तळोजा वसाहतीत अनेक भागात पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे ‘सिडको'च्या व्यवस्थापकीय संचालकांनी ‘सिडको'च्या पाणी पुरवठा प्रकल्पांना भेटी ऐवजी तळोजावासियांची पाणी समस्या जाणून घ्यावी.
-विनायक ठाकूर, रहिवासी, सेवटर-७, तळोजा वसाहत.