सरकारकडून नेहमीच माथाडी कामगारांच्या हिताचे निर्णय -उपमुख्यमंत्री फडणवीस

नवी मुंबई : एकेकाळी हमाल म्हणून गणल्या गेलेल्या माथाडी कामगारांवर कोणीही लक्ष देण्यास तयार नव्हते. या कामगारांचे भविष्य काय, त्यांच्या मुलांचे भविष्य काय, असे अनेक प्रश्न होते, तर त्यांच्यासाठी कोणताही कायदा त्या काळात नव्हता. त्यांची आर्थिक पिळवणूक आणि कामगारांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांना परिसीमा नव्हती. अशा या कामगारांसाठी स्व. अण्णासाहेब पाटील यांनी अथक परिश्रमाने ऐतिहासिक माथाडी कामगार कायद्याची निर्मिती केली. क्रांतीसुर्य स्व. अण्णासाहेब पाटील माथाडी कामगारांचे दैवत असून आम्हीही त्यांच्याकडे दैवत म्हणून पाहतो. त्यांच्या कार्यापासून आम्हाला मोठी प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई येथे केले.

ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळीचे आणि मराठा आरक्षण मागणीचे जनक मराठा क्रांतीसुर्य कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९१ व्या जयंती निमित्त नवी मुंबईतील एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट मधील लिलावगृह येथे महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने अयोजित माथाडी मेळाव्यात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

माथाडी कामगार समाजाचा महत्वाचा घटक असून आमच्या सरकारने नेहमीच माथाडी कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले. माथाडी कामगारांच्या घरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावू. त्यांचे वडाळा, नाशिक येथे निर्माण झालेेले प्रश्न पुढील १५ दिवसात सोडवू, अशी ग्वाही देतानाच माथाडी बांधवांचा पैसा गडप करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे सुतोवाच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

माथाडी कामगारांचे कित्येक प्रश्न आताही प्रलंबित असून ते प्रश्न मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर सोडवावे. यामध्ये नाशिक येथील माथाडी कामगारांच्या लेव्हीचा प्रश्न. कायद्यानुसार आमच्या बाजुने निकाल लागूनसुध्दा त्याची अंमलबजावणी आडते,  व्यापारी विरोध करीत असल्यामुळे होत नाही. तेव्हा नाशिक येथील ५००० माथाडी कामगारांना न्याय द्यावा. दुसरे म्हणजे नवी मुंबई येथे फ्रुट मार्केट मध्ये बांग्लादेशी कामगार कमी मजुरीमध्ये काम करीत असल्यामुळे माथाडी कामगारांवर अन्याय होत आहे. त्यांना कोणताही अधिकार अथवा ते देशाचे नागरिक नसुनही अनधिकृतपणे काम करीत आहेत. सदर प्रकार त्वरित थांबावावा., तसेच ट्रक टर्मिनल येथे सिडकोची वसाहत उभी राहत आहे. तेथे बाजार समितीच्या मार्केट मधील कामगारांना घरे देण्यास प्राधान्य द्यावे आण पंतप्रधान आवास योजनेतही प्राधान्य द्यावे, अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी आपल्या भाषणात केली.

माथाडी कायद्यात बदल करा; पण तो बदल माथाडी कायद्याशी संबंधित सर्व घटकांना सुसह्य आणि न्याय देणारा असावा. याशिवाय अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे नामांतर मराठा क्रांतीसुर्य अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ असे करण्याची मागणीही नरेंद्र पाटील यांनी यावेळी केली.

स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ऐसिहासिक कामगार कायद्याच्या निर्मितीमुळे आज माथाडी कामगारांचे अस्तित्व अबाधित आहे. माथाडी कायदा बदलण्याचे प्रयत्न अनेक सरकारांनी केले, आताही तीच परिस्थिती आहे. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कारकीर्दीत या माथाडी कायद्यातील त्रुटींमध्ये सुधारणा करुन या कायद्याला कायमस्वरूपी सुरक्षा कवच निर्माण करून द्यावे. माथाडी कामगार हाही तसा अल्पभूधारक असून पंतप्रधान आवास योजनेतील घरे ही माथाडी कामगारांना मिळाली पाहिजे, असे युनियनचे कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रास्ताविकातून सांगितले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध माथाडी मंडळातील १८ गुणवंत माथाडी कामगारांना माथाडी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून व्यवसाय उभारणाऱ्या माथाडी कामगारांमधील मराठा उद्योजकाचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये १ लाख मराठा तरुण-तरूणींना उद्योजक केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

याप्रसंगी अ. गणेश नाईक, आ. मंदाताई म्हात्रे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, नमुंमपा आयुक्त डॉ.  कैलास शिंदे, भाजपचे रामचंद्र घरत, दत्ता घंगाळे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे, अधिकारी दिपक शिंदे, माजी पंचायत समिती सभापती वसंतराव मानकुमरे, जावली बँकेचे अध्यक्ष विजय भिलारे, बाजार समितीचे सभापती अशोक डक, सचिव पी. एल.खंडागळे आणि सर्व व्यापारी प्रतिनिधी तसेच माथाडी पतपेढीचे व्यवस्थापकीय संचालक रमेश पाटील, युनियनच्या कायदेशीर सल्लागार ॲड. भारती पाटील, युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, आनंद पाटील, रविकांत पाटील, दिलीप खोंड आणि तमाम माथाडी कामगार हजाराेंच्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित होते.

कार्यक्रमात आभार प्रदर्शन संघटनेचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप यांनी तर सूत्रसंचालन संयुक्त सरचिटणीस पोपटराव देशमुख यांनी केले.

दुसरीकडे मराठी आरक्षणाची मागणी कायद्याच्या चौकटीत बसवून मार्गी लावण्यासाठी महायुती सरकारकडून प्रामाणिक प्रयत्न सुरु आहेत. मराठा समाजाला जे आरक्षण दिले जाईल ते न्यायालयात टिकणे महत्वाचे आहे. पोलीस भरतीत मराठा समाजाला उत्तम संधी मिळाली. सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातून १२ आयएएस, १८ आयपीएस आणि ४८० एमपीएससी उमेदवार यशस्वी झाले. तर आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ८४०० कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले असून जवळपास या मंडळाच्या माध्यमातून १ लाख उद्योजक घडले, अशी माहिती ना. देवेंद्र फडणीस यांनी कार्यक्रमात दिली.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबईतील जमिनी फ्री होल्ड करण्याची मागणी