सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांची नवी मुंबई विमानतळ प्रकल्प स्थळी पाहणी

नवी मुंबई : ‘सिडको'चे अध्यक्ष आ. संजय शिरसाट, यांनी २४ सप्टेंबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळाला भेट देऊन प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. याप्रसंगी ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सह-व्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल, दिलीप ढोले, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन-विमानतळ) गीता पिल्लई, मुख्य अभियंता (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्प-विशेष प्रकल्प) शीला करुणाकरन तसेच विमानतळ प्रकल्पाशी संबंधित ‘सिडको'चे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

‘सिडको'तर्फे ११६० हेक्टर क्षेत्रावर, २ टप्प्यांमध्ये देशातील सर्वांत मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ असणारा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प साकारण्यात येत आहे. नवी मुंबई विमानतळ प्रतिवर्ष ९० दशलक्ष प्रवासी आणि २.५ टन मालवाहतुकीकरिता नियोजित आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे विमानांच्या स्वतंत्र प्रवर्तानाकरिता २ समांतर धावपट्ट्या आणि पूर्ण लांबीचे २ समांतर टॅक्सी-वे असणार आहेत. सार्वजनिक खासगी भागीदारीतून विकसित करण्यात येत असलेल्या विमानतळाच्या विकासाची जबाबदारी सवलतधारक कंपनी एनएमआयएएल यांच्यावर आहे. विकासपूर्व कामे पूर्ण होऊन प्रत्यक्ष विमानतळाच्या कामाला सुरुवात झाली आहे. नुकतीच विमानतळ प्रकल्प स्थळी ‘भारतीय विमानतळ प्राधिकरण'तर्फे घेण्यात आलेली सिग्नल चाचणी आणि इन्स्ट्रूमेंट लँन्डींग सिस्टीम चाचणी यशस्वीरित्या पार पडली.

दरम्यान, सदर या भेटीदरम्यान अध्यक्ष संजय शिरसाट यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत ‘सिडको'चे अधिकारी आणि सवलतधारक एनएमआयएएलच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. तसेच प्रकल्पाची अंमलबजावणी नियोजित वेळेत पूर्ण व्हावी, याकरिता संबंधितांना निर्देश दिले.

‘सिडको'तर्फे साकारण्यात येत असलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प राष्ट्रीय दृष्टीकोनातून महत्त्वाचा प्रकल्प आहे. नवी मुंबईसह राज्याच्या आणि देशाच्या विकासाकरिता सदर प्रकल्प योगदान देणार आहे. प्रकल्पाच्या कामाची प्रगती समाधानाकारक आहे. प्रकल्पाच्या गतिमान अंमलबजावणीकरिता कालमर्यादेमध्ये कामे पूर्ण करण्याचे संबंधितांना निर्देशही देण्यात आले आहेत. यामुळे लवकरच येथून विमानाचे उड्डाण होणार आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तळोजा वसाहतीला भेट देवून पाणी समस्या जाणून घेण्याची मागणी