पप्पू कलानी कुटुंब शरद पवार यांच्या भेटीला
उल्हासनगर : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचे बिगुल वाजू लागले असून त्यासाठी महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्षांनी रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. अशातच उल्हासनगर विधानसभासाठी ओमी कलानी यांना तिकीट मिळण्यासाठी पप्पू कलानी कुटुंबाने शरद पवार यांची भेट घेतली असून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे बोलले जात आहे.
मुंबई येथील ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष'च्या कार्यालयात माजी आमदार पप्पू कलानी, ओमी कलानी, ‘राष्ट्रवादी'च्या जिल्हाध्यक्षा पंचम कलानी यांनी शरद पवार यांची भेट घेतली. याप्रसंगी आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.
ओमी कालानी पहिल्यांदाच आमदारकीच्या निवडणुकीत उतरणार असून त्यांनी शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी'ला पसंती दर्शवलेली आहे. त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे तिकीट मागणार असल्याचे ओमी यांनी जाहीर केले होते. विशेष म्हणजे विधानसभा निवडणूक जिंकायचीच या ठाम निश्चयाने ओमी कलानी यांनी जुलै महिन्यात थेट गोवा मध्ये बैठकीचे आयोजन करुन ‘कोअर कमिटी'ची घोषणा केलेली आहे. त्यात अध्यक्ष डॉ.जयराम लुल्ला, मार्गदर्शक पप्पू कलानी, पदाधिकारी नरेंद्र कुमारी ठाकूर, सुमित चक्रवर्ती, पीतू राजवानी, नोनी धामेजा, नरेश दुर्गानी, ओमी कालानी, संजय सिंह चाचा, सत्यन पुरी, राजेश टेकचंदानी, अजित माखीजानी, मनोज लासी, शिवाजी रगडे, ॲड. मनिष वाधवा, मोनू सिद्दीकी, संतोष पांडे, पंचम ओमी कालानी, कमलेश निकम, कार्यालय प्रमुख आनंद शिंदे, होशियार सिंह लबाना यांचा समावेश आहे.
पप्पू कालानी आणि त्यांचे कुटुंब उल्हासनगरसाठी समीकरण असून पप्पू कालानी यांनी चार वेळा, स्वर्गीय ज्योती कालानी यांनी एकदा आमदार पद भूषविले आहे. यावेळेस ओमी कालानी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले असून पप्पू कालानी प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. पप्पू कलानी जेलमधून बाहेर आल्यापासून ते हितचिंतकांच्या प्रत्येक कार्यक्रमात, सोहळ्यात सहभागी होऊन ओमी कलानी यांच्यासाठी वातावरण निर्मिती करु लागले आहेत. त्यामुळे ‘भाजपा'चे विद्यमान आमदार कुमार आयलानी यांना विधानसभा निवडणुकीत सामना करावा लागणार आहे.
दुसरीकडे ओमी कलानी यांचे डिपॉझिट जप्त होणार असे आ. कुमार आयलानी म्हणत असले तरी पप्पू कलानी यांनी वाढवलेली जनसंपर्काची खेळी टर्निंग पॉईंट ठरण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीसाठी ‘शिवसेना'चे माजी महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, रिपाइं आठवले गटाचे माजी शहराध्यक्ष तथा माजी उपमहापौर भगवान भालेराव आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष भरत (गंगोत्री) राजवानी, ‘भाजपा उत्तर भारतीय सेल'चे अध्यक्ष संजय गुप्ता यांनीही कंबर कसली असून पक्षाने तिकीट दिले तर निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी ठेवली आहे.