कर्मवीरांचे कार्य जातपात विरहित - माजी खासदार रामशेठ ठाकूर  

नवी मुंबई : ‘रयत शिक्षण संस्था'चे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जात, धर्म, पंथ असा कोणताच भेदभाव न करता सर्व धर्मातील, सर्व जातीतील मुलांना शिक्षण देऊन गोरगरीबांच्या मुलांच्या आयुष्याचे कल्याण केले. कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याची दखल आज देशपातळीवर घेतली जाते, ते फार महत्वाचे आहे. कर्मवीरांचा दृष्टीकोन फार विशाल होता. त्यांनी आपल्या संस्थेतून मुलांना जातीपाती विरहित शिक्षण देण्याचे महत्वपूर्ण काम केल्याचे प्रतिपादन ‘रयत'च्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी वाशी येथे व्यक्त केले.

‘रयत शिक्षण संस्था'च्या वाशी मधील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज आणि मॉडर्न स्वुÀल यांच्या संयुक्त विद्यमाने २३ सप्टेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंती सोहळ्याचे आयोजन केबीपी महाविद्यालयात करण्यात आले होते. यावेळी रामशेठ ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ‘रयत'च्या उपाध्यक्षा जयश्रीताई चौगुले यांनी भूषविले.  

या कार्यक्रमात ‘केबीपी कॉलेज'च्या वतीने सोलापूर (मोहोळ) येथील ‘प्रार्थना फाऊंडेशन'चे संस्थापक प्रसाद मोहिते यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार तर प्रसाद मोहिते यांच्या पत्नी अनु मोहिते यांना लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रोख २५ हजार, शाल, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे दोन्ही पुरस्काराचे स्वरुप आहे.  

पुरस्कारप्राप्त प्रसाद मोहिते यांनी ‘प्रार्थना फाऊंडेशन'चा प्रवास आणि कार्य विस्तार आपल्या मनोगतातून व्यक्त केला. ‘फाऊंडेशन'ने अनाथ मुलांना व रस्त्यावर, भिक्षा मागणाऱ्या मुलांना एकत्र करुन त्यांच्यासाठी वंचिताची शाळा सुरु केली आहे. तसेच ‘फाऊंडेशन'ने मोफत वृध्दाश्रम स्थापन करुन समाजातील निराधार वृध्द आजी-आजोबा यांना आश्रय आणि आधार दिला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन मोहिते दाम्पत्याला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी अनु मोहिते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी रामशेठ ठाकूर यांनी ‘प्रार्थना फांऊंडेशन'च्या सामाजिक कामाचे कौतुक करीत या संस्थेला ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा नायक यांनी केले. आभार प्रदर्शन शाळेच्या प्राचार्या सुमित्रा भोसले यांनी तर सूत्रसंचालन डॉ. आबासाहेब सरवदे आणि प्रा. माया कळविकट्टे यांनी केले. दरम्यान, कर्मवीर जयंती सप्ताहातील सर्व कार्यक्रम आणि उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्या डॉ. राजेश्री घोरपडे यांनी विशेष मेहनत घेतली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पप्पू कलानी कुटुंब शरद पवार यांच्या भेटीला