लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कुटुंबाचा ‘रयत'तर्फे गौरव
पनवेल : कर्तृत्व, दातृत्व, सामाजिक बांधिलकी असलेले आणि समाजकारणाला महत्व देत सामाजिक दायित्व पार पाडणारे ‘रयत शिक्षण संस्था'च्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कुटुंबियांनी विद्यमान शैक्षणिक वर्षात ‘रयत'ला ७.११ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्याबद्दल त्यांचा ‘रयत शिक्षण संस्था'च्या वतीने ‘संस्था'चे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते कर्मवीर जयंतीनिमित्त समारंभपूर्वक हृद्य गौरव करण्यात आला.
बहुजनांच्या शिक्षणाचे वटवृक्ष ‘रयत'चे संस्थापक पदमभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३७ वा जयंती सोहळा २२ सप्टेंबर रोजी सातारा येथे कर्मवीर भूमीत अनेक मान्यवर आणि हजारो रयत सेवकांच्या उपस्थितीत पार पडला.
लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कुटुंबियांनी ‘रयत'च्या विकासासाठी सातत्याने भरीव मदत करून या संस्थेच्या प्रगतीसाठी नेहमीच मोलाचा हातभार लावला आहे. आजपर्यंत १०० कोटीहून अधिक रुपयांची देणगी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ‘रयत'ला दिली आहे. कर्मवीर अण्णांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांचा शैक्षणिक वारसा जपण्याचे अखंड कार्य माजी खासदार रामशेठ ठाकूर करत आहेत. रामशेठ ठाकूर यांनी विधायक कामाला प्रोत्साहन देण्यासाठी नेहमी मुक्तहस्ते मदत केली आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या विद्यालयांना उभारी देण्याचे काम त्यांनी केले आहे. विद्यमान शैक्षणिक वर्षात रामशेठ ठाकूर यांनी २.६५ कोटी रुपये, त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर यांनी ३.९१ कोटी रुपये तर सुपुत्र परेश ठाकूर यांनी ५५ लाख रुपयांची देणगी ‘रयत'ला दिली आहे. त्याबद्दल त्यांचा यावेळी संस्थेच्या वतीने सत्कार करुन आभार व्यक्त करण्यात आले. तसेच सात्रल विद्यालयाच्या विकासासाठी ५० लाख रुपयांची देणगी दिल्याबद्दल रामशेठ ठाकूर यांचा शाखेच्या वतीनेही सत्कार करण्यात आला.
रयत आणि ठाकूर कुटुंबियांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचावे, यासाठी कर्मवीर अण्णांनी केलेले कार्य पुढे नेण्याचे काम रयत सेवक म्हणून रामशेठ ठाकूर सतत करीत आहेत. स्वतःची जनार्दन भगत शिक्षण प्रसारक शैक्षणिक संस्था असतानाही ठाकूर यांचे ‘रयत'वर असलेले जीवापाड प्रेम कायम अधोरेखित झाले आहे. रयत शिक्षण संस्था मातृसंस्था माणून सदैव ‘रयत'च्या विकासासाठी कार्य करणारे रामशेठ ठाकूर यांनी संपूर्ण देशात आदर्श घालून दिला आहे. ‘रयत'च्या प्रत्येक उपक्रमात त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यामुळे ‘रयत'च्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा कायम राहिला आहे.
सदर कार्यक्रमाप्रंगी ‘रयत'चे चेअरमन चंद्रकांत दळवी, संघटक डॉ.अनिल पाटील, व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, ‘सिवकीम'चे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, ‘रयत'चे उपाध्यक्ष अरुण कडू-पाटील, सचिव विकास देशमुख, आमदार बाळसाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार सुमन पाटील, जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, वैशाली देशमुख, जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत, शुभांगी घरत, ‘कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ'चे कुलगुरू ज्ञानदेव म्हस्के यांच्यासह मॅनेजिंग कौन्सिल व जनरल बॉडी सदस्य, रयत सेवक उपस्थित होते.