राष्ट्रीय पोषण माह राबविण्यात देशात महाराष्ट्र अव्वल  

नवी मुंबई : राष्ट्रीय पोषण अभियानातंर्गत राज्याच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागामार्फत 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत संपुर्ण राज्यात विविध उपक्रम राबवून पोषण माह साजरा करण्यात येत आहे. या राष्ट्रीय उपक्रमात एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाने महाराष्ट्र राज्यातील अंगडवाडयामध्ये तब्बल 1 कोटी 68 लाख 15 हजार 195 उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पोषण माह राबविण्यात महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय पातळीवर देशात अव्वल ठरला आहे. अशी माहिती एकात्मिक बाल विकास योजनेचे आयुक्त (अंगणवाडी) कैलास पगारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  

देशातून कुपोषणाचे उच्चाटन करण्यासाठी सुपोषित भारत या संकल्पनेस अनुसरुन राष्ट्रीय पातळीवर पोषण अभियान कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. महिला व बालकांच्या आहारासंदर्भात असलेले गैरसमज दूर व्हावेत, महिलांनी बालकांच्या पोषणासाठी काय काळजी घेतली पाहिजे. या संबंधित माहिती जनसामान्यपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत संपुर्ण देशात व राज्यात 7 वा राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत महिला व बालकांचे आरोग्य व पोषण या स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने व सुपोषित भारत ही संकल्पना साकारण्याच्या दुष्टीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.  

राज्यात आतापर्यंत अंगणवाडी स्तरावर एकूण 1 कोटी 68 लाख 15 हजार 195 इतके उपक्रम राबविण्यात आले असून यामध्ये एक पेड माँ के नाम अभियान, चिमुकल्यांची वसुंधरा अभियान, ऍनेमिया, बाळाचे पहिले हजार दिवस, बाळांची वृद्धी सनियंत्रण, डायरिया प्रतिबंध आणि पोषण भी पढाई भी असे विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांची नोंद केंद्र शासनाच्या जनआंदोलन डॅशबोर्डवर घेण्यात आली आहे. त्यानुसार राष्ट्रीय पोषण माह राबविण्यात महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती आयुक्त कैलास पगारे यांनी दिली.  

संपूर्ण राज्यभर साजरा होत असलेल्या 7 व्या राष्ट्रीय पोषण माह मध्ये केंद्र शासनाने, ऍनेमिया, ग्रोथ मॉनिटरींग, वरचा आहार, पोषण भी पढाई भी आणि उत्तम प्रशासनासाठी  तंत्रज्ञानाचा वापर या पाच संकल्पना निश्चित करुन दिल्या आहेत. या कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यातील ग्रामीण, आदिवासी व नागरी क्षेत्रातील एकूण 553 बालविकास प्रकल्पातील 1 लाख 10 हजार 516 अंगणवाडी केंद्रांमध्ये करण्यात येत आहे.  

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील 29 लाख 36 हजार 924 बालके, 3 वर्षे ते 6 वर्षे वयोगटातील 24 लाख 62 हजार 690 बालके, तर 4 लाख 94 हजार 74 गरोदर महिला तसेच 4 लाख 96 हजार 852 स्तनदा माता त्याचप्रमाणे गडचिरोली, नंदूरबार, धाराशीव आणि वाशिम या चार जिल्हयातील 1 लाख 12 हजार 395 किशोरवयीन मुली या योजनेचा लाभ घेत आहेत.     

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पर्यावरणपूरक गणोशोत्सवाला पनवेलकरांचा सकारात्मक प्रतिसाद