‘एनएमएमटी'ची बससेवा पुन्हा सुरु करण्याची मागणी
उरण : अपघाताच्या घटनेनंतर उरणकर नागरिकांनी बंद पाडलेली नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाची (एनएमएमटी) बससेवा पुन्हा सुरु करावी, अशी मागणी उरणच्या जेष्ठ नागरिक आणि मॉर्निंग कट्टा ग्रुपने केली आहे. या मागणीच्या अनुषंगाने उरण शहरात सह्यांची मोहीम सुरु करण्यात आली असून त्याला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
फेब्रुवारी महिन्यामध्ये खोपटे येथे झालेल्या भीषण अपघातानंतर नवी मुंबईसाठी प्रवासाची जीवनरेखा ठरलेली ‘एनएमएमटी'ची बससेवा व्यवस्थापनाने कामगारांची सुरक्षा आणि तोट्यात चालणारा मार्ग ठरवून अनिश्चित काळासाठी बंद केली आहे. याचा फटका उरणच्या प्रवाशांना बसत आहे. यामध्ये विशेषतः जेष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि कामगार यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे उरणकर प्रवाशांना आपले निश्चित ठिकाण गाठण्यासाठी पुन्हा एकदा धोकादायक खाजगी वाहतुकीचा आसरा घ्यावा लागला आहे. यामुळे वेळ आणि अधिकच्या खर्चाचा भार आता उरणकरांच्या खिशावर पडत आहे.
उरण ते कोपरखैरणे, जुईनगर रेल्वे स्थानक, कळंबोली दरम्यानच्या ३०,३१ आणि ३४ या क्रमांकाच्या मार्गावरील ‘एनएमएमटी'ची बससेवा परिवहन उपक्रमाकडून पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या व्यवस्थेला पर्याय म्हणून उरण ते बेलापूर, नेरुळ मार्गावरील लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ करण्याची प्रवाशांची आग्रही मागणी आहे. उरण रेल्वे स्थानकातून एका तासाने लोकल सुटत आहेत. त्यामुळे नवी मुंबई, मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तासभर लोकलची वाट पहावी लागते. शिवाय उरण शहरातून रेल्वे स्थानक गाठण्यासाठी प्रवाशांना रिक्षाचे अधिकचे भाडे मोजावे लावत आहे. या समस्येमुळे शहरातून आणि तालुवयातील गावाजवळून जाणाऱ्या ‘एनएमएमटी'मुळे उरणकर प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा होता. मात्र, बससेवा बंद झाल्याने नागरिकांना अनेक संकटांचा सामना करीत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे ‘एनएमएमटी'ची बससेवा लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी उरणकर नागरिकांकडून केली जात आहे.