पोलीस कर्मचारी व त्यांच्या पाल्यांसाठी सीबीडी पोलिसांचा अनोखा उपक्रम  

पोलीस आयुक्तांकडुन पोलीस ठाण्यातील अभ्यासिकेचे कौतुक  

नवी मुंबई  : पोलिसांकडुन जप्त होणारा मुद्देमाल आता मध्यवर्ती मुद्देमाल कक्षात जमा होत असल्याने पोलीस ठाण्यातील रिकाम्या झालेल्या जागेचा सीबीडी पोलिसांनी कल्पतेने वापर करुन त्याठिकाणी पोलीस कर्मचारी व त्यांच्या पाल्यांसाठी अतिशय उत्कृष्ट अशी अभ्यासिका सुरु केली आहे. पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी पोलीस ठाण्यात सुरु करण्यात आलेल्या या अभ्यासिकेचे कौतुक केले आहे. तसेच अशा प्रकारचे उपक्रम इतर पोलीस ठाण्यांनीही राबवावेत असे मत व्यक्त केले आहे.  

नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांच्या संकल्पनेतून गुह्यात जफ्त केलेला मुद्देमाल व वाहने आता आयुक्तालय स्तरावर एकाच ठिकाणी जमा होत असल्याने नवी मुंबई आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन मधील बरीच जागा रिकामी झाली आहे. तसेच मुद्देमाल ठेवलेल्या काही रुम रिकाम्या झाल्या होत्या. सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी या जागेचा कल्पकरित्या उपयोग करुन आपले सहकारी अधिकारी व कर्मचा-यांसाठी बॅडमिंटन कोर्ट, ओपन जिम असे उपक्रम सुरु केले होते. त्यानंतर त्यांनी मुद्देमाल ठेवलेल्या रुमचे रुपांतर पोलीस कर्मचारी व त्यांच्या पाल्यांकरिता अतिशय उत्कृष्ट अशा अभ्यासिकेमध्ये केले आहे.  

या अभ्यासिकेचे उद्घघाट्न पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे, परिमंडळ-1 चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये प्रथमच पोलीस ठाण्यात अभ्यासिका सुरु करण्याचा उपक्रम वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी सुरु केल्याने त्यांचे सर्व स्तरातून  कौतुक होत आहे. पोलीस ठाण्यात सुरु करण्यात आलेल्या अभ्यासकेमध्ये स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकास तसेच कायद्याच्या पुस्तकांसह आत्मचरित्रे, कथा कादंब-या अशी एकूण 300 ते 350 पुस्तके ठेवण्यात आली आहेत.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अलिशान महानिवास प्रकल्प रद्द करण्याची मागणी