नेरुळ-जुईनगर मधील नागरी समस्या सोडवा; अन्यथा दालनात ठिय्या आंदोलन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वच्छता ही सेवा अभियानचा शुभारंभ
ठाणे : ठाणे महापालिकेच्या ‘स्वच्छता ही सेवा' या अभियानाचा शुभारंभ १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पारसिक रेतीबंदर विसर्जन घाट येथे करण्यात आला. यावेळी पारसिक घाटावर उपस्थित असलेल्या नागरिकांना आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची असून प्रत्येकांनी स्वच्छतेबाबत जागरुक राहण्याचे आवाहन करीत मुख्यमंत्र्यांनी सर्वांना स्वच्छतेची प्रतिज्ञा दिली.
याप्रसंगी खासदार नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिवत आयुक्त-१ संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त-२ प्रशांत रोडे, उपायुवत मनिष जोशी, शंकर पाटोळे, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
‘मी स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागरुक राहीन, मी स्वतः कुठेही कचरा फेकणार नाही आणि दुसऱ्यालाही फेकू देणार नाही. त्याचबरोबर ‘स्वच्छ भारत मिशन'मधील माझा सहभाग म्हणून माझ्या घरात, माझ्या दुकानात, कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करुन ओला कचरा हिरव्या कचरा पेटीत आणि सुका कचरा निळ्या कचरा पेटीत टाकीन, तर घरगुती घातक कचरा लाल कचरा कुंडीतच टाकेन. तसेच प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वापराला प्रतिबंध करुन माझे ठाणे शहर, पर्यायाने माझे राष्ट्र, माझा देश प्लास्टीक आणि थर्माकोल मुक्त होण्यासाठी मी सदैव कटिबध्द राहीन' अशी शपथ देवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘स्वच्छता ही सेवा' अभियानाचा शुभारंभ केला.
या अभियानाच्या काळात शहरात जनजागृतीपासून प्रत्यक्ष सफाईपर्यत उपक्रम संपूर्ण शहरात आयोजित केले जाणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते एक पेड माँ के नाम यासाठी नागरिकांना रोपे आणि कंपोस्ट खताचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, स्वच्छता ही सेवा अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत देशभरात मोठ्या उत्साहात साजरे जाणार आहे. या अभियानातंर्गत 'एक पेड मा के नाम', ‘स्वच्छता कर्मचारी, लाडकी बहीण योजना आणि हरित ठाणेचे प्रतिनिधित्व करणारे सेल्फी पॉईंट उभारण्यात येणार आहेत. तसेच अभियान अंतर्गत शहरात अनेक ठिकाणी क्लीन ड्राईव्ह घेण्यात येणार आहेत. स्वच्छता अभियान केवळ २ ऑक्टोबर पर्यंत मर्यादित राहणार नाही, तर त्यानंतरही ते सुरु राहणार असून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे.