अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभुमीवर नवी मुंबई पोलिसांकडून शहरात चोख बंदोबस्त
नवी मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी नवी मुंबई पोलिसांकडुन संपुर्ण शहरात तसेच विसर्जनस्थळावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गणेश भक्तांनी देखील अनंत चतुर्दशीच्या दिवशी शांततेत श्री गणेशाचे विसर्जन करावे असे आवाहन नवी मुंबई पोलिसांकडुन करण्यात आले आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकुण 886 सार्वजनिक तर 92 हजार 601 घरगुती गणेश मुर्तींची स्थापना करण्यात आली असून यातील दिड, अडीच, पाच, सहा व सात दिवसाच्या गणेश मुर्तींचे तसेच गौरीचे विसर्जन शांततेत पार पडले आहे. अनंत चतुर्थीच्या दिवशी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकुण 448 सार्वजनिक व 20 हजार 589 खाजगी गणेश मुर्तींचे विसर्जन होणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
त्यासाठी 6 पोलीस उपआयुक्त,10 सहाय्यक पोलीस आयुक्त, 50 पोलीस निरीक्षक, 234 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरिक्षक तसेच 2170 पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्याशिवाय स्ट्रायकिंग फोर्स, क्यूआरटी,आरसीपी, एसआरपीएफ चे प्लाटून तसेच होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे विसर्जन स्थळे, मिरवणुकीचे मार्ग यावर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडु नये यासाठी नवी मुंबई पोलिसांचे प्रशिक्षीत बॉम्ब शोधक व नाशक पथक तैनात करण्यात आले आहेत.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील वाशी-जागृतेश्वर मंदिर तलाव, तुर्भे तलाव, कोपरखैरणे खाडी तलाव,नेरुळ-चिंचोली तलाव, करावे गाव तलाव, दारावे गाव तलाव, सीबीडी-आग्रोळी तलाव, ऐरोली नाका तलाव, रबाळे-ऐरोली सेक्टर-20 खाडी तलाव, दिघा तलावात सुमारे 2000 खाजगी तर 25 सार्वजनिक गणपतीचे विसर्जन होणार आहे. तसेच परिमंडळ-2 मध्ये कामोठे सेक्टर-15 येथील तलाव, कळंबोली-रोडपाली तलाव, खारघर-स्पॅगेटी तलाव, पनवेल-वडघर खाडी पनवेल, उरण विमला तलावातील विसर्जन घाटावर 856 खाजगी तर 9 सार्वजनिक गणपतीचे विसर्जन होणार आहे. पोलीस आयुक्तालयाकडून या महत्वाच्या 16 विसर्जन घाटावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. उर्वरीत विसर्जनाच्या ठिकाणी स्थानिक पोलीस ठाणे व स्थानिक स्वराज्य संस्थेच्यावतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
त्याशिवाय पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील पोलिसांचा गणेश विसर्जन मिरवणुकांवर वॉच राहणार आहे. अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश विसर्जनापुर्वी सर्व विसर्जन स्थळांची बॉम्ब शोधक व नाशक पथकामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. त्याशिवाय गणेश विसर्जन शांततेत व्हावे, ध्वनी प्रदुषण कायद्याचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस ठाणे स्तरावर गणेशोत्सव मंडळाच्या बैठका व डॉल्बी मालकांच्या बैठका देखील घेण्यात आल्या आहेत.
ध्वनी प्रदुषणाचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यात ध्वनी प्रदुषण विरोधी पथक तयार करण्यात आले असून या पथकातील पोलीस कर्मचाऱयांना ध्वनीमापक यंत्रे हातळण्याबाबतचे प्रत्याक्षिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. अनंत चतुर्थीच्या दिवशी हे प्रशिक्षित अधिकारी कर्मचारी आवाजाची मर्यादा ओलांडणाऱया मंडळावर कारवाई करणार आहेत.
संजय येनपुरे (सहपोलीस आयुक्त नवी मुंबई)
गणेश विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी नवी मुंबई पोलिसांकडुन संपुर्ण शहतात तसेच विसर्जनस्थळावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गणेश भक्तांनी देखील अनंत चतुर्दशीच्या दिवशी शांततेत श्री गणेशाचे विसर्जन करावे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, नागरिकांना कुणी संशयीत व्यक्ती निदर्शनास आल्यास तात्काळ त्याची माहिती पोलिसांना द्यावी.