नवी मुंबईत सर्रास गुटखा विक्री
गुटख्याची तस्करी रोखण्याचे नवी मुंबई पोलिसांसमोर आव्हान
नवी मुंबई : राज्यात गुटखा, सुंगधी तंबाखू सारखे आरोग्यास हानीकारक असलेले पदार्थ विक्रीस आणि बाळगण्यास बंदी असतानाही नवी मुंबईत परराज्यातून गुटखा, सुंगधी तंबाखुसारखे पदार्थ छुप्या पध्दतीने येत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील पान टपऱ्यांवर अगदी सहजतेने गुटखा आणि सुगंधीत तंबाखू उपलब्ध होत असल्याचे नवी मुंबई पोलिसांनी परिमंडळ-१च्या हद्दीत ऑगस्ट महिन्यामध्ये विविध भागातील पान टपऱ्या, पान शॉप आणि किराणा मालाच्या दुकानावर केलेल्या ६० कारवायांवर दिसून येत आहे. पोलीस तसेच अन्न-औषध प्रशासनाकडून गुटखा बाळगणाऱ्या आणि विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा जप्त केला जात असला तरी गुटख्याची विक्री थांबत नसल्याचे चित्र सध्या नवी मुंबईत पहावयास मिळत आहे.
आरोग्यास हानिकारक असलेल्या गुटखा आणि तंबाखुजन्य पदार्थामुळे निर्माण होणाऱ्या विकारांमुळे जीवही जातो. त्यामुळे तरुणांना व्यसनाधिनतेपासून दूर ठेवून निरोगी, सदृढ समाजाच्या निर्मितीसाठी राज्यात हातभट्टी दारु, गुटखा, मावा आदिंच्या विक्रीवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे त्याचे काटेकोर पालन होत नसल्याने काही भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी यांच्या आश्रयाखाली अवैध व्यवसाय चालत असल्याचे अनेकदा समोर आले आहे.
इतर राज्यात गुटखा उत्पादनास आणि विक्रीस बंदी नसल्याने पर राज्यातून तस्करी करुन खुष्कीच्या मार्गाने विविध वाहनांचा वापर करुन गुटखा आणि तंबाखुजन्य पदार्थ महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला जात असल्याचे पोलीस तसेच अन्न- औषध प्रशासन विभागाने वेळोवेळी केलेल्या विविध कारवायांवरुन दिसून आले आहे. तस्करी करुन राज्यात आलेल्या गुटखा, सुगंधीत तंबाखुच्या विक्रीची दरवर्षीची उलाढाल कोट्यवधींच्या घरात असल्याचे बोलले जाते. राज्याच्या सीमेवर पोलिसांचे तपासणी नाके असतानाही गुटखा येतोच कसा? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
नवी मुंबई पोलिसांच्या परिमंडळ-१ मधील १० पोलीस ठाण्यांनी आपल्या हद्दीतील ६० पान टपऱ्या, पान शॉप आणि किराणा मालाच्या दुकानावर छापेमारी करुन लाखो रुपये किंमतीचा गुटखा आणि इतर तंबाखुजन्य पदार्थ जप्त केले आहे. तसेच संबंधीत पान टपरी आणि शॉप चालकाविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाई प्रमाणेच नवी मुंबई पोलिसांनी मागील वर्षामध्ये देखील अनेक गुटखा विक्रेते आणि पुरवठादारांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून लाखो रुपये किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा, पानमसाला तसेच इतर तंबाखुजन्य पदार्थाचा साठा जप्त केला आहे.
मात्र, त्यानंतर देखील नवी मुंबईत छोट्या-छोट्या पान टपऱ्यांवर, दुकानांमध्ये गुटख्याची खरेदी विक्री सुरुच असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नवी मुंबई शहराला गुटखा आणि अंमली पदार्थ मुक्त करण्याचा नारा ‘नवी मुंबई'चे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडून देण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे शहरात अंमली पदार्थ आणि गुटखा तसेच तंबाखुजन्य पदार्थाच्या खरेदी-विक्री सुरुच असल्याने नवी मुंबई शहर गुटखा आणि अंमली पदार्थ मुक्त कधी होणार? असा प्रश्न नवी मुंबईकरांकडून उपस्थित केला जात आहे.
गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने ६ ऑगस्ट रोजी तळोजा येथील घोट गावातील घरावर मध्यरात्री छापा मारुन महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला सुमारे १०.२५ लाख रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत गुन्हे शाखेने गुटख्याचा साठा करुन ठेवणाऱया मोहम्मद आबीद मोहम्मद खालिद खान (२५) या तरुणाला अटक केली आहे. तर रबाले एमआयडीसी पोलिसांनी १६ ऑगस्ट रोजी रात्री ठाणे-बेलापूर मार्गावर सापळा लावून वॅगनार कारमधून नेला जाणारा गुटखा, पानमसाला आणि सुगंधीत तंबाखुचा २.४४ लाख रुपये किंमतीचा साठा पकडण्याची कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी गुटखा आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या कार चालकाला अटक केला आहे.
गत महिन्यातील कारवाया...
नवी मुंबई पोलिसांच्या परिमंडळ-१ मध्ये पोलिसांनी आपल्या हद्दीतील पान टपऱ्या, पान शॉप आणि किराणा मालाची झाडाझडती घेऊन अवैधरित्या छुप्या पध्दतीने विक्री केला जाणारा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत एपीएमसी पोलीस ठाणेच्या हद्दीत ८, कोपरखैरणे ७, तुर्भे एमआयडीसी ६, सीबीडी, रबाले आणि एनआरआय प्रत्येकी ३, रबाले एमआयडीसी, वाशी आणि नेरुळ प्रत्येकी २ आणि इतर काही पान टपऱ्यांवर अशा एकूण ५० पेक्षा अधिक कारवाया करण्यात आल्या आहेत. या सर्व पान शॉप चालक-मालकांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच या सर्वांचे पान शॉपही सिल केले आहेत.