पावसाळ्यातील साथरोग, किटकजन्य आजार टाळण्यासाठी काळजी घ्या
पनवेल : पावसाळी कालावधीत विविध प्रकारचे किटकजन्य तसेच साथजन्य आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे. दरम्यान, वैद्यकिय आरोग्य विभागामार्फत घ्यावयाच्या खबरदारी विषयी विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. महापालिकेने दिलेल्या सुचनांचे पालन करुन नागरिकांनी पुरेशी दक्षता बाळगल्यास या आजारांवर वेळीच प्रतिबंध घालणे शक्य आहे.
पावसाळ्यामध्ये अनेकवेळा दुषित पाण्यामुळे कॉलरा, गॅस्ट्रो, विषमज्वर असे जलजन्य रोग होण्याची भिती असते. त्यामुळे नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून प्यावे. तसेच भाज्या, फळे, आदि वस्तू स्वच्छ धुवून मगच खाण्यासाठी वापराव्यात. सर्व केरकचरा घंटागाडीतच टाकावा. घर आणि सभोवतालचा परिसर जास्तीत जास्त स्वच्छ ठेवावा. आपल्या इमारतीतील पाण्याची टाकी निर्जंतुक करावी. साचलेले पाणी, डबकी यातील पाणी वाट काढून वाहून जाईल, अशी सोय करावी. जेणेकरुन डास उत्पन्न होणार नाहीत. शिळे आणि उघड्यावरचे अन्न खाऊ नये, विहरीचे पाणी शुध्दीकरण करुनच पिण्यास वापरावे. अतिसार झाल्यास क्षार संजीवनी मिश्रणाचा वापर करावा. घरांतर्गत डास उत्पत्तीस्थाने टाळण्यासाठी घरातील फुलदाणी मनीप्लँट,वॉटर कुलर आदिंमधील पाणी आठवड्यातून एक वेळा पूर्णपणे काढून कोरडे करुन कोरडा दिवस पाळावा, अशा सूचना महापालिकेचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी केले आहे.
तसेच जेवणापूर्वी आणि शौचास जाऊन आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुणे, पूर्ण शिजवेले आणि ताजे अन्न खावे, रस्त्यांवरील उघडे अन्नपदार्थ खावू नये. ज्या ठिकाणी स्वच्छता पाळली जात नाही, अशा हॉटेल तसेच इतर ठिकाणी खाणे, पाणी पिणे टाळावे. बाहेरील बर्फ खाणे टाळावे. ताप सर्दी, खोकला अशा प्रकारची लक्षणे असल्यास नजिकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असेही डॉ. गोसावी यांनी सांगितले.
एमएमआर क्षेत्रातील ठाणे महापालिका क्षेत्राची डेंग्यू पॉझिटीव्हिटी ४५.३४ टक्के, कल्याण -डोंबिवली महापालिका क्षेत्राची डेंग्यू पॉझिटीव्हिटी ३५.१० टक्के, नवी मुंबई महापालिकेची डेंग्यू पॉझिटीव्हिटी ५३ टक्के आहे. या सर्व महापालिकांच्या तुलनेत पनवेल महापालिकेची डेंग्यू पॉझिटीव्हिटी ८.१२ टक्के आहे. म्हणजेच पनवेल महापालिकेची डेंग्यू पॉझिटीव्हिटी १० टक्क्यांपेक्षा कमी असल्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. महापालिका क्षेत्रात साथ उद्रेक परिस्थिती नसली तरी नागरिकांनी सतर्क रहावे. आपला परिसर आणि घर स्वच्छ ठेवा. कोरडा दिवस पाळा, परिसरात पाणी साठू देऊ नका. डासोत्पत्ती स्थाने नष्ट करा आणि महापालिका प्रशासनाला सहकार्य करा.
-मंगेश चितळे, आयुवत-पनवेल महापालिका.