नवी मुंबई भाजपाचे  राहुल गांधींविरोधात जळजळीत आंदोलन 

नवी मुंबई : काँग्रेसचे नेते  राहुल गांधी यांच्या  संविधान विरोधी भूमिकेचा माजी आमदार तथा नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष  संदीप नाईक यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये जळजळीत निषेध करण्यात आला.

 नवी मुंबई भाजपा जिल्हा  युवा मोर्चा आणि अनुसूचित जाती मोर्चा यांच्या वतीने हे आंदोलन ऐरोली येथील  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका जवळ करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नमन करून  राहुल गांधी यांच्या आरक्षण विरोधी वक्तव्याचा धिक्कार  करण्यात आला. जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित मेढकर, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष राजेश शिंदे,  नवीन गवते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या आंदोलनामध्ये  भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. 

 बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानिक आरक्षण बंद पाडण्याचा राहुल गांधी यांचा  डाव भाजपा हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अमित मेढकर यांनी दिला.  राहुल गांधी यांची संविधान विरोधी भूमिका पुन्हा एकदा जगासमोर आली असून त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी राजेश शिंदे यांनी केली. राहुल गांधी यांनी माफी मागितली नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा नवीन गवते यांनी दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिन दुबळ्यांना दिलेले आरक्षण राहुल गांधी यांना संपवायचे आहे. त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी टीका  चंद्राम  सोनकांबळे यांनी केली. तर राहुल गांधी यांच्या  संविधान विरोधी वक्तव्यातून काँग्रेसचा खरा चेहरा समोर आल्याचे राजेंद्र इंगळे म्हणाले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

आलिशान संकुलातील घरे विक्रीसाठी २८ कोटींचा सल्ला