‘रेल्वे'मधून वन्यजीव तस्करी
ठाणे : मेरठ येथून बांद्रा टर्मिनसमध्ये येणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्यांमधून वातानुकूलित डब्यातून पोपटांची तस्करी करणाऱ्या रेल्वे अटेंडंटच्या वन्यप्राणी तस्करीचा पर्दाफाश वाईल्ड वेल्फेअर असोसिएशन आणि वन विभागाच्या संयुक्त मोहिम राबवून केला. सदर कारवाईत मुख्य सुत्रधारासह चौघांना अटक करण्यत आली. या कारवाईत एक दुर्मिळ रेड ब्रेस्टेड पोपट, ४० स्टार कासवे आणि ७० च्या आसपास पोपट अशी ११५ वन्यजीवांची नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्यात आल्याची माहिती ‘डब्लु डब्लुए'चे मानद वन्यजीव रक्षक रोहित मोहिते यांनी दिली.
गणेशाच्या आगमनाची धामधुम सुरु असताना ६ सप्टेंबर रोजी मेरठ-बांद्रा मेलच्या एसी कंपार्टमेंट मधून वन्यजीवांची तस्करी होत असल्याची खबर रेल्वेतील दक्ष प्रवाशाने डब्लुडब्लुए या सेवाभावी संस्थेला दिली. त्यानुसार ठाणे जिल्हा वन्यजीव रक्षक रोहित मोहिते यांच्या पथकाने बांद्रा टर्मिनसला सापळा लावला होता. यावेळी पथकाने वन विभागाच्या मदतीने ४४ पोपट जप्त करुन रेल्वे अटेंडंटच्या मुसक्या आवळल्या. अटेंडंटच्या चौकशीत वन्यजीव क्रॉफर्ड मार्केट मधील बडा वन्य तस्कर मोहम्मद ईब्राहिम याने मागवल्याचे समोर आल्याने पथकांनी क्रॉफर्ड मार्केट बाहेर सापळा रचुन मोहम्म्द ईब्राहिमच्या डिलिव्हरी बॉयला पकडले. या डिलिव्हरी बॉयला खाकी हिसका दाखवताच त्याने ईब्राहिमचे वन्य प्राणी ठेवलेले मुख्य गोदाम दाखवले.
सदर गोदामातून महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल, एक दुर्मिळ रेड ब्रेस्टेड पोपट, ४० स्टार कासवे आणि ३० च्या आसपास हिरवे पोपट असे एकूण ११५ वन्यजीव सापडले. तसेच मोहम्म्द ईब्राहिम यालाही जेरबंद करण्यात आले. मोहम्मद इब्राहिम वन्यजीव तस्कर असून तो देशातील विविध शहरांमध्ये तसेच शेजारी राष्ट्रांमध्येही वन्यजीव तस्करी करीत असल्याची सुत्रांची माहिती आहे.
दरम्यान, कोणीही वन्यप्राण्यांची शिकार, विक्री किंवा जवळ बाळगू नये, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.