पाणी बिलाची थकबाकी ठेवणाऱ्यांवर महापालिकेची कारवाई

ठाणे : ठाणे महापालिकेची पाणी बिल थकबाकी वसुलीकरिता पाणी पुरवठा विभागाने कारवाई सुरु केली आहे. या मोहिमेत शिळ-दिवा भागात ६ मोटर पंप जप्त करण्यात आले. तर ११ नळ जोडण्या खंडीत करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पाणी बिलाची रक्कम भरुन महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडीत करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून बिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडीत करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रुम सील करण्यात येत आहेत. तसेच पाणी बिलाचा भरणा न करता, खंडीत नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करुन घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचीही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपनगर अभियंता (पाणीपुरवठा) विनोद पवार यांनी दिली.

थकीत बिलावरील प्रशासकीय आकारात सूट...
महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळ संयोजनाच्या थकीत देयकाची चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सूट लागू करण्यास महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मान्यता दिली आहे. थकीत पाणीपट्टी बिलावरील दंडात १०० टक्के इतकी भरीव सवलत जाहीर करण्यात आल्याने नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार असून या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापालिका तर्फे करण्यात आले आहे.

सदर योजना १ सप्टेंबर २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत लागू राहील. सदर योजनेचा लाभ घेऊन थकीत आणि चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरुन त्यावरील प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सवलत योजनेचा लाभ नागरिक घेवू शकतील. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती पाणी बील धारकांनी पाणी पुरवठा देयके जमा केली असतील अशांना सदरची सवलत योजना लागू असणार नाही. तसेच योजना व्यावसायिक संयोजन धारकांना लागू असणार नाही. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

५२३ हुन जास्त सेझग्रस्त शेतकऱ्यांना न्यायाची प्रतिक्षा