मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांची ठाणे मनपा कर्मचारी गणेशोत्सव मंडळाला भेट

ठाणे : ठाणे महापालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीनेमहापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापालिका कर्मचारी, मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आणि ठाणेतील सृजनसखी महिला यांनी मंगळागौर सादर केली. याप्रसंगी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या पत्नी प्रियांका राव, माजी नगरसेविका नम्रता भोसले, उपायुक्त मीनल पालांडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. चेतना नितील, कार्यालयीन अधीक्षक रिमा देवरुखकर, आदि उपस्थित होते.

ठाणे महापालिका कर्मचारी गणेशोत्सवाचे यंदाचे ४२ वे वर्षे आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गेली २ वर्षे ठाणे महापालिका अधिकारी-कर्मचारी पारंपरिक अशी मंगळागौर सादर करतात. यंदाही ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नव्या जुन्या पारंपरिक खेळाचा मेळ साधत नाविन्यपूर्ण अशी मंगळागौर सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी सर्व महिलांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या पत्नी प्रियांका राव यांच्यासह खेळात सहभागी होत मंगळागौरीचा आनंद लुटला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रकल्पग्रस्तांची वाढीव बांधकामे लवकरच नियमित