महावाचन उत्सवात 5 हजाराहून अधिक विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी अधोरेखित केले पुस्तकांचे महत्व
नवी मुंबई : वाचन हे व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्वाचे साधन असून कोणत्याही व्यक्तीच्या विकासासाठी आणि समाजाच्या व राष्ट्राच्या उन्नतीसाठी वाचनसंस्कृती रुजविणे आवश्यक आहे हे लक्षात घेत राज्यातील सर्व शाळांमध्ये महावाचन चळवळ राबविण्याचा निर्णय 16 जुलै 2024 या शासन निर्णयानुसार घेण्यात आलेला आहे.
शैक्षणिक वर्ष 2024 - 25 मध्ये राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव 2024’ हा उपक्रम उत्साहाने राबविला जात आहे. याकरिता इयत्ता तिसरी ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी ते बारावी असे तीन गट करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार व इच्छेनुसार अभ्यासाव्यतिरिक्त मराठी साहित्य विश्वातील नावाजलेल्या साहित्यिकांचे विविध साहित्य, कथा, कादंबऱ्या यांची निवड करून वाचन करीत आहेत व त्यावर विचार करून पुस्तकाचा सारांश लिहीत आहेत. हा सारांश महावाचन पोर्टलवर अपलोड केला जात आहे.
या वाचन चळवळीचा एक भाग म्हणून ‘महावाचन उत्सव 2024’ अंतर्गत श्रीगणेशोत्सवाची सुट्टी लागण्यापूर्वी कोपरखैरणे गाव येथील नमुंमपा शाळा क्रमांक 36 येथे वाचनीय पुस्तकांचे ग्रंथालय प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या ग्रंथालय प्रदर्शनामध्ये कोपरखैरणे परिसरातील 22 शाळा सहभागी झाल्या होत्या. या प्रदर्शनाप्रसंगी 97 मुख्याध्यापक, 71 पालक, 136 शिक्षक, 5143 विद्यार्थी अशा एकूण 5447 उपस्थितांनी या प्रदर्शनाला भेट देत ग्रंथसंपदेचा अनुभव घेतला.
या ग्रंथालय प्रदर्शनाचे शुभारंभ शिक्षण विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी महापालिका सचिव तथा कवयित्री चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी अरुणा यादव, कवी मोहन काळे उपस्थित होते. यावेळी चित्रा बाविस्कर व मोहन काळे यांनी विद्यार्थ्यांना सुंदर कविता ऐकवत वाचनाचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी काही विद्यार्थ्यांनी कविता गायन केले. वाचन संस्कृती जपणुकीच्यसा दृष्टीने महत्वाच्या असणा-या या अभिनव उपक्रमात शिक्षक, विद्यार्थी, पालक यांचा उत्स्फुर्तपणे सहभाग लाभला. काही पालकांनीही याप्रसंगी आपल्या मनोगतात वाचनाचे महत्व सांगितले.
या महावाचन उत्सव उपक्रमाच्या माध्यमातून लहानथोरांनी एकत्रित येऊन पुस्तकांचे महत्व अधोरेखित केले.