घोडबंदर रोडवरील वाहतुकीच्या परिस्थितीत लवकरच सुधारणा
ठाणे : घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचा परिणाम नागरिकांना लवकरच दिसू लागेल. आज असलेल्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी तातडीच्या आणि दीर्घ मुदतीच्या उपाययोजना हाती घेण्यात येत असल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
घोडबंदर रोडवरील वाहतुकीच्या समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी महापालिका मुख्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीस आमदार प्रताप सरनाईक, घोडबंदर रोड येथे राहणाऱ्या नागरिकांचे प्रतिनिधी, पोलीस उपायुक्त (वाहतूक) दिपक शिरसाट, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, शहर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह वाहतूक पोलीस, महापालिका, मेट्रो, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
सदर बैठकीत नागरिकांनी, अवजड वाहनांच्या वेळा, रस्त्याची स्थिती, सेवा रस्त्यावरील पार्किग, हातगाड्या, सिग्नल यंत्रणा, लेन मार्किंग, पलायओव्हरची स्थिती, वाहतुकीचे नियम मोडणारे नागरिक आदि समस्या मांडल्या. या समस्यांमुळे नागरिकांचे विशेषतः शाळकरी मुलांचे होणारे हाल होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
आ. प्रताप सरनाईक यांनीही नागरिकांच्या समस्यांना दुजोरा दिला. त्याचबरोबर घोडबंदर रोडवरील अवजड वाहतूक बंद व्हावी यासाठी भविष्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्य सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांची माहिती यावेळी दिली. तसेच अवजड वाहनांच्या वेळा पाळणे आणि बेकायदा पार्किंग थांबवणे यावर पोलिसांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही सरनाईक म्हणाले. नागरिकांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दलही सरनाईक यांनी त्यांचे आभार मानले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणेतील समस्यांबाबत अतिशय संवेदनशील आहेत. घोडबंदर रोड येथील समस्यांची त्यांना कल्पना आहे. ते त्याबद्दल सातत्याने निर्देश देत असतात. आताही गणपती विसर्जनापूर्वी सगळे रस्ते, पलायओव्हर खड्डेमुक्त करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
सदर बैठकीत चर्चा झाल्याप्रमाणे अवजड वाहनांच्या प्रवेशाची नियमावली काटेकोरपणे पाळली जावी. वाहतूक विभागाच्या मदतीसाठी सध्या ५० वॉर्डन असून त्यांना आणखी १०० वॉर्डन तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावेत. त्यांचे नियोजन कापूरबावडी ते गायमुख या पट्ट्यात करण्यात यावे. वाहतूक पोलीस आणि वॉर्डन सकाळी ६ वाजल्यापासूनच रस्त्यावर तैनात असतील. सकाळी ६ ते १० आणि सायं. ५ ते ९ या काळात त्यांची विशेष ड्युटी असेल, असे आयुक्त राव यांनी सांगितले.
रस्त्याची स्थिती सुधारण्यासाठी महापालिका तत्काळ उपाययोजना करीत असून त्याचे परिणाम १५ दिवसात दिसू लागतील. लेन मार्किंग, दिशा दर्शक, पलायओव्हरवरील प्रवेशापासून डिव्हायडर, झेब्रा क्रॉसिंग, जिथे रात्रीच्या वेळी जादा प्रकाशाची व्यवस्था हवी आहे तिथे ती सोय करण्यात येईल, असेही आयुक्त राव म्हणाले.
सेवा रस्त्यावरील पार्किंग थांबवणे, हातगाड्या काढणे हे काम महापालिका तातडीने करणार आहे. तसे निर्देश स्थानिक उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांना आयुक्त राव यांनी दिले.
कार्यकारी अभियंता संजय कदम महापालिकेच्या वतीने संबंधित नागरिक, यंत्रणा यांच्याशी नोडल ऑफिसर म्हणून समन्वय साधतील. घोडबंदर रोड ठाणे महापालिकेचीच पूर्णपणे जबाबदारी आहे. कोणतीही जबाबदारी पालिका ढकलणार नाही, असेही यावेळी आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.