दीड दिवसांच्या १०,६७२ श्रीगणेशमुर्तींचे भावपूर्ण विसर्जन

पर्यावरणपूरक दृष्टीकोनातून २७६६ गणेशमुर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन

नवी मुंबई : श्रीगणेशोत्सव-२०२४ ‘इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त' साजरा करावा अशाप्रकारे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केलेल्या आवाहनास पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. ७ सप्टेंबर रोजीच्या श्रीगणेश चतुर्थीपासून प्रारंभ झालेल्या श्रीगणेशोत्सवात दीड दिवस कालावधीतील १०,६७२ श्रीगणेशमूर्तीचे भक्तीमय वातावरणात विसर्जन संपन्न झाले. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील २२ नैसर्गिक विसर्जन स्थळे तसेच १३६ कृत्रिम विसर्जन स्थळे अशा १५८ विसर्जन स्थळांवर दीड दिवसाच्या श्रीगणेशमूतींना भक्तीपूर्ण निरोप देण्यात आला.

२२ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर ७८९५ घरगुती तसेच ११ सार्वजनिक मंडळांच्या ७९०६ श्रीमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. तसेच १३६ कृत्रिम विसर्जन स्थळांवर २७६१ घरगुती तसेच ५ सार्वजनिक मंडळांच्या २७६६ श्रीमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. अशाप्रकारे १०,६५६ घरगुती आणि १६ सार्वजनिक मंडळांच्या एकूण १०,६७२ श्रीमूर्तीचे विसर्जन सुरळीतपणे पार पडले. यामध्ये शाडूच्या २१७४ मूर्तीचे पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.

दुसरीकडे ‘नवी मुंबई'चे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस विभाग आणि वाहतूक पोलीस विभाग कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने तसेच वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने दक्षतेने कार्यरत होती.

दीड दिवस कालावधीचे श्रीगणेशमूर्ती विसर्जन नमुंमपा आणि पोलीस यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करत सुव्यवस्थित रितीने पार पाडल्याबद्दल नवी मुंबईकर नागरिकांचे आभार मानतो. यापुढील विसर्जनाच्या दिवशीही सोहळा शांततेत आणि सुव्यवस्थित रितीने पार पाडण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे. इकोफ्रेंडली दृष्टिकोन जपत आपल्या घराजवळील कृत्रिम विसर्जन तलावांचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. - डॉ. कैलास शिंदे, आयुवत - नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘ठाणे'साठी हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित