दिवाळीच्या अगोदर वीज समस्या मार्गी लावा संदीप नाईक यांची महावितरण कडे मागणी
बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने नवी मुंबईत शस्त्रास्त्र संग्रहालय उभारावे
नवी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपता येतो, तो लोकांना कळावा, त्यांना अनुभवता यावा यासाठी नवी मुंबईत ऐतिहासिक शस्त्रास्त्र संग्रहालय बांधले जावे आणि संग्रहालयाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी ‘मनसे' प्रवक्ते तथा शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे केली.
मराठी माणसाचा उर ज्यांचे नाव घेताना ऐकताना अभिमानाने भरुन येतो, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांच्या काळातील शस्त्र आणि वस्तुंचे प्रदर्शन करणारे अनेक संग्रहालय महाराष्ट्रात आहेत. मात्र, नवी मुंबईत असे कुठलेच संग्रहालय नाही. ती नवी मुंबईकर म्हणून एक खंत आहे. म्हणूनच छत्रपतींच्या काळातील शस्त्र, तैलचित्र यांचे दर्शन घडवणारे संग्रहालय आपल्या नवी मुंबईतही उभारावे, अशी मागणी ‘मनसे'च्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन केली आहे.
यामुळे नवी मुंबईकरांना तसेच येणाऱ्या सगळ्या पुढील पिढीला आपल्या इतिहास अनुभवण्याची संधी मिळेल.
शिवकालीन इतिहास जपावा असे प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील स्वप्न आहे, इच्छा आहे आणि तोच इतिहास जतन करण्याचे काम या संग्रहालयातून होईल. तरी शस्त्रास्त्र, लढायांचे आणि तैलचित्र असलेले संग्रहालय उभारुन कायमच महाराष्ट्र आणि मराठीसाठी लढणाऱ्या शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या शस्त्रास्त्र संग्रहालयास द्यावे, अशी तमाम नवी मुंबईकरांच्या वतीने विनंती गजानन काळे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली.
‘मनसे'च्या या शिष्टमंडळात गजानन काळे यांच्यास महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, पालिका कामगार सेना शहर अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे, विभागअध्यक्ष अमोल आयवळे, जनहित कक्ष उपशहरअध्यक्ष अंकुश सानप उपस्थित होते.