मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
मिरा भाईंदरः मिरा-भाईंदर शहरातील महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ३६ शाळांमध्ये आधीपासून कार्यान्वित असलेले२०० सीसीटीव्ही कॅमेरे एकाच ठिकाणी केंद्रित करुन त्यावर देखरेख आणि नियत्रंण ठेवण्यासाठी महापालिकेने तयार केलेल्या अद्ययावत मध्यवर्ती शाळा नियत्रंण कक्षाचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ५ सप्टेंबर रोजी पार पडले.
सदर उपक्रम राबविणारी मिरा-भाईंदर महापालिका राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. इतर महापालिकांनी सुध्दा मिरा-भाईंदरचा आदर्श घेऊन सदर उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी सक्षम रहावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास आयुवत संजय काटकर, आमदार प्रताप सरनाईक, पोलीस आयुक्त मधुकर पांडे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, शहर अभियंता दिपक खांबित, उपायुक्त (मुख्यालय) संजय दोंदे, नगरसचिव वासुदेव शिरवळकर, उपायुक्त कल्पिता पिंपळे, उपायुक्त डॉ. सचिन बांगर तसेच मिरा-भाईंदर महापालिका अधिकारी, कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
अत्याधुनिक सर्व्हर आणि विशेष कार्यप्रणालीयुक्त असा युपीएस जनरेटर बॅकअप असलेल्या नियंत्रण कक्षात एकाच वेळी साधारण १००० सीसीटिव्ही कॅमेऱ्यांवर नजर ठेवणारी अद्यावत यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या कक्षात संगणक, व्हिडीओ वॉल, सभा कक्ष, एक बॅकअप सर्व्हर, देखरेख ठेवण्यासाठी असलेले अधिकारी-कर्मचारी आणि प्रशस्त वातानुकूलित जागा असलेल्या या कक्षात सद्यस्थितीत मनपा शाळा यांच्यावर लक्ष केंद्रित केले असून भविष्यात मिरा-भाईंदर शहरातील सर्व खाजगी शाळेतील सीसीटिव्ही कॅमेरे सुध्दा या उपक्रमात समाविष्ट करण्यात येतील.
सदर नियत्रंण कक्षात कार्यरत असलेले पथक मनपा शाळेतील सीसीटीव्ही फुटेज सकाळी ७ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत तपासण्याचे आणि त्याचे जतन करण्याचे काम करतील. मिरा-भाईंदर महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उचललेल्या या महत्त्वपूर्ण पावलामुळे भविष्यात घडणाऱ्या अनुचित घटनांवर कायमस्वरुपी आळा बसून सदर विषय अतिशय संवेदनशीलपणे हाताळण्यात नक्कीच मदत होणार असल्याचा विश्वास यावेळी आयुवत संजय काटकर यांनी व्यवत केला.