बाप्पा पावला!
विद्यार्थी-पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण
नवी मुंबई : गेली अनेक वर्षे नवी मुंबईतील सर्व शाळांना गणेशोत्सव निमित्त गणेश चतुर्थी ते गौरी-गणपती विसर्जन पर्यंत सुट्टी दिली जाते. गणेशोत्सव दोन दिवसांवर आला तरी गणेशोत्सवाच्या सुट्टी संदर्भात महापालिका शिक्षण विभागाकडून अद्याप घोषणा करण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेक पालक संभ्रमात होते. शिक्षण विभागाने सुट्टीची घोषणा न केल्याने काही मुजोर शाळांनी शाळेला सुट्टी तर दिली नाहीचः पण गणेशोत्सव दरम्यान विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुध्दा ठेवल्या. हिंदू सणांना ठेच पोहोचवणाऱ्या घटनांनी व्यथित होऊन ‘मनसे'चे प्रवक्ते तथा नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सहकाऱ्यांसह ‘नमुंमपा'चे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या दालनात धडक दिली.
यावेळी गजानन काळे यांचा आक्रमक पवित्रा पाहून सुनिल पवार यांनी शिक्षण विभाग उपायुक्त संघरत्न खिलारे आणि शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांना दालनात पाचारण केले. गत १२ वर्षांपासून दरवर्षी गणेशोत्सवाला अशी सुट्टी देण्यात येते, असे ‘मनसे'ने पुराव्यासह पटवून सांगितले. ‘मनस'च्या आक्रमक पवित्र्यानंतर आणि अभ्यासपूर्ण मांडणी नंतर अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांना ७ दिवसाची सुट्टी जाहीर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नवी मुंबईतील सीबीएसई, आयसीएसई, सरकारी-खाजगी अशा सर्व शाळांना ७ ते १३ सप्टेंबर पर्यंत ७ दिवसांची सुट्टी घोषित करत असल्याचे पत्र महापालिका शिक्षण विभागाकडून काढण्यात आले.
दरम्यान, नवी मुंबईतील कोणत्याही शाळेने जर गणेशोत्सवाची सुट्टी जाहीर केली नाही तर पालकांनी नजिकच्या मनसे शाखेत संपर्क करावा किंवा ९६६४२७८७१७ या मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन ‘मनसे'तर्फे करण्यात आले.
‘मनसे'च्या सदर शिष्टमंडळात गजानन काळे यांच्या सह उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, शहर सचिव सचिन कदम, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, चित्रपट सेना उपाध्यक्ष श्रीकांत माने, पालिका कामगार सेना शहर संघटक आप्पासाहेब कोठुळे, रस्ते आस्थापना शहर संघटक संदीप गलुगडे, रोजगार विभाग शहर संघटक सनप्रीत तुर्मेकर, चित्रपट सेना शहर संघटक अनिकेत पाटील उपस्थित होते.
गणेशोत्सव महाराष्ट्रातील महत्त्वाचा सण आहे. अनेकांच्या घरात बाप्पा विराजमान असतात. तर बहुतांश सोसायटी मध्ये बाप्पा विराजमान असतात. तसेच मोठ्या प्रमाणात कोकणी माणसे आपल्या गावी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी जात असतात. अशा वेळी महापालिका शिक्षण विभागाने सुट्टी जाहीर न केल्याने काही मुजोर शाळा याचा गैरफायदा घ्ोतात, ते दुर्दैवी आहे. पण, आता सर्व शाळांना सात दिवस सुट्टी मिळाल्याने पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
-गजानन काळे, शहर अध्यक्ष-नवी मुंबई, मनसे.