‘गणेशोत्सव'साठी पनवेल महापालिका सज्ज
पनवेल : येत्या ७ सप्टेंबर पासून गणोत्सवास सुरुवात होत आहे. महापालिकेच्या वतीने गणोत्सवाची तयारी पूर्ण होत आली असून आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार बांधकाम विभागाच्या वतीने कृत्रिम तलाव, घनकचरा आणि आरोग्य विसर्जन घाटाच्या साफसफाईचे काम अंतिम टप्प्यात आले आहेत. याबरोबरच पर्यावरण विभागातर्फे मुर्तीदान केंद्र, निर्माल्यापासून अगरबत्ती निर्मिती, निर्माल्यासाठी कागदी पिशव्यांचे वाटप असे अभिनव उपक्रम राबविले जात आहेत.
यावर्षी महापालिकेच्या बांधकाम विभागातर्फे ८९ ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. यामध्ये ४१ ठिकाणी नैसर्गिक विर्सजन ठिकाणे असून ४८ ठिकाणी कृत्रिम तलावांची विसर्जनासाठी सोय करण्यात आली आहे. सदर ४८ कृत्रिम ठिकाणीही शाडू मातीच्या गणपतींसाठी वेगळे तलाव आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मुर्तींच्या विसर्जनासाठी वेगळ्या तलावांची सोय करण्यात आली आहे. सदर सर्व विसर्जनाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक, विद्युत व्यवस्था, सीसीटिव्ही स्टेज, टॉवरची सोय, टेबल-खुर्च्या, लाऊड स्पीकर, निर्माल्य कलश, लाईव्ह जॅकेटची सोय करण्यात आली आहे.
घनकचरा आणि आरोग्य विभागातर्फे विसर्जन घाटांच्या स्वच्छतेची कामे जवळपास पूर्ण झाली आहे. महापालिका क्षेत्रातील २५० पेक्षा जास्त गणेश मंडळाच्या दारात जाऊन दररोज निर्माल्य गोळा करण्यासाठी महापालिकेने विशेष ‘निर्माल्य रथ' तयार केले आहेत.
सदर उपक्रम यावर्षी प्रथमच राबविला जाणार असून यासाठी ४ विशेष वाहनांची सोय करण्यात आली आहे. या निर्माल्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यात येणार आहे. विसर्जन दिवशी विसर्जन घाटावरील स्वच्छतेसाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षीही पनवेल महापालिका तर्फे ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा' मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत पर्यावरण विभाग तर्फे निर्माल्यापासून अगरबत्ती तयार करण्याचा अभिनव प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. नागरिकांना निर्माल्य कलशामध्ये निर्माल्य टाकण्यासाठी महापालिका क्षेत्रामधील गणेश मूर्ती विक्री केंद्रामध्ये महापालिकेच्या वतीने कागदी पिशव्या आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिकेच्या वतीने तयार केलेल्या सप्तसूत्रीच्या पत्रकांचे वाटप करण्यात येत आहे. तसेच महापालिका कार्यक्षेत्रात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला जास्तीत जास्त चालना देण्यासाठी पनवेल मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पाण्याच्या टाकीजवळ पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्ती विक्री केंद्र उभारण्यात आले आहे. याठिकाणी श्री मुर्त्या माफक दारात विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत.
तसेच विसर्जनाच्या दिवशी गणेश मुर्तीदान करणाऱ्या आणि कृत्रिम तलावामध्ये विर्सजन करणाऱ्या नागरिकांना प्रशस्तीपत्रक देण्यात येत येणार आहे. तसेच महापालिकेने १० आणि ५ दिवसांचे सार्वजनिक गणेश मंडळे, दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, दहा दिवसांच्या घरगुती गणेशोत्सवांसाठी ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव' स्पर्धा आयोजित केली आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जनजागृती कार्यक्रम...
माझी वसुंधरा ४.० अंतर्गत महापालिका तर्फे ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा' मोहिम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शाळा, महाविद्यालयांमध्ये शाडू माती गणेश मूर्ती कार्यशाळा, पोस्टर स्पर्धा, जनजागृती कार्यक्रम, परिसंवादांचे आयोजन करण्यात येत आहेत.
तसेच ३ सप्टेंबर रोजी पुनरावर्तन संस्था पुणे यांच्या वतीने महापालिका कार्यक्षेत्रातील विविध एनजीओ आणि नागरिकांसाठी विसर्जनानंतर शाडू मातीचा पुर्नवापर याविषयांवर ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. याबरोबरच विसर्जनादिवशी देखील या एनजीओचे सदस्य कृत्रिम तलावाच्या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून उपस्थित राहून महापालिकेला सहकार्य करणार आहेत.