नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा
नवी मुंबईकर गुणवंत खेळाडुंना क्रीडा शिष्यवृत्ती प्रदान
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील शालेय क्रीडा स्पर्धांना जिल्ह्याचा दर्जा प्राप्त झाल्याने नवी मुंबई शहरातील शालेय विद्यार्थ्यांना थेट मुंबई विभागीय स्तरावर खेळण्याची सुवर्णसंधी लाभलेली आहे. पूर्वी नवी मुंबईतील खेळाडुंना ठाणे जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर प्रथम खेळून जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये स्पर्धांचे आयोजन होत असल्याने तेथे जावे लागत असे. त्यामुळे स्पर्धांमध्ये नवी मुंबईतील बहुतांश शाळा सहभागी होत नसत.
मात्र, आता क्रीडा-युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या मान्यतेने नवी मुंबई महापालिकेला शालेय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्ह्याचा दर्जा प्राप्त झाल्याने नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये शाळांचा सहभाग वाढत जाऊन आज २५० हून अधिक शाळांचा आणि ४५ हजार हून अधिक खेळाडुंचा सहभाग लाभत आहे. विशेषतः मुंबई विभागामध्ये राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरावर सव्रााधिक खेळणारे खेळाडू नमुंमपा क्षेत्रातील आहेत.
महापालिका ठरावानुसार खेळाडुंना अधिक प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा नैपुण्य प्राप्त खेळाडुंना गतवर्षीची क्रीडा शिष्यवृत्ती प्रदान करुन खेळाडुंचा सत्कार तसेच क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी सहयोग करणाऱ्या संस्थांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मान्यतेने विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे संपन्न झाला.
यावेळी प्रमुख अतिथी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू, अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू आणि सध्या ठाणे येथे पोलीस उपायुक्त (वाहतूक) या पदावर कार्यरत असलेले पंकज शिरसाट यांनी प्राविण्यप्राप्त खेळाडुंचे अभिनंदन करीत मनोगतात खेळाडुंनी सरावास आणि मेहनतीस अधिक महत्व द्यायला हवे, असे सांगितले. खेळाडूंनी मैदानाची सेवा करणे अत्यंत गरजेचे असून पालकांनीसुध्दा मुलांना खेळामध्ये काय मिळेल यापेक्षा आपण खेळासाठी अधिक चांगले काय करुन शकतो यावर लक्ष देण्यास त्यांनी सुचविले.
आ. गणेश नाईक यांच्या हस्ते नवी मुंबई शहरातील क्रीडा सुविधा असलेल्या आणि स्पर्धा आयोजनास सहयोग करणाऱ्या खाजगी स्पोर्टस् असोसिएशन, जिमखाना, शाळा-महाविद्यालये यांचा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. त्याचबरोबर सन २०२२-२३ मधील जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर प्राविण्यप्राप्त आणि क्रीडा शिष्यवृत्तीसाठी पात्र ९३६ खेळाडुंपैकी प्रातिनिधिक स्वरुपात १० खेळाडुंचा सन्मान करण्यात आला. यामध्ये ९३६ खेळाडुंना ३०.६२ लाख रुपये क्रीडा शिष्यवृती रक्कम ऑनलाईन पध्दतीने खेळाडुंच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
याप्रसंगी जिल्हास्तर स्पर्धा आयोजन समिती सदस्य धनंजय वनमाळी, सुधीर थळे, महापालिका सचिव चित्रा बाविस्कार, क्रीडा विभागाच्या उपायुक्त अभिलाषा पाटील, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव तसेच नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशन, ऐरोली स्पोर्टस् असोसिएशन, नेरुळ जिमखाना तसेच विविध शाळा आणि महाविद्यालयांचे पदाधिकारी, प्राचार्य, क्रीडा शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक यांच्यासह मोठ्या संख्येने विविध शाळांमधील खेळाडू आणि पालक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोलकुमार वाघमारे यांनी केले.