नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा
जावे विंदांच्या कवितांच्या गावा.....
गोंविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करंदीकर यांना साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठित ‘ज्ञानपीठ पुरस्कार' त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी देण्यात आला. स्वेदगंगा ते अष्टदर्शने या त्यांच्या काव्य प्रकारात विविध वळणे आहेत. त्यात कमालीची विविधता आहे. कवितेत एकाच वेळी सामर्थ्य, सुकोमलता, अवखळपणा आणि मार्दव, प्रगाढ वैचारीकतेबरोबरच नाजूक भावसौंदर्याचा एकदम प्रत्यय येतो.
विंंदांच्या ‘असा मी तसा मी कसा मी कळेना' कविता की ज्यात जीवनाचे मर्म, गूढ उलगडतात. त्या कवितांविषयी ....,
असा मी तसा मी कसा मी कळेना - विंंदा करंदीकर
कधी येतसे क्षुद्रता कस्पटाची
कधी वाढता वाढता व्योम व्यापी
कधी धावतो विश्व चुंबावयाला
कधी आपणाला स्वहस्तेच शापी
कधी याचितो सत कधी स्वप्न याची
कधी धावतो काळ टाकून मागे
कधी वर्षतो अमृताच्या सरी अन
कधी मृत्यूची भाबडी भीक मागे
कधी दैन्यवाणा, निराधार होई
कधी गूढ, गंभीर, आत्मप्रकाशी
कधी गर्जतो सागराच्या बळाने;
कधी कापतो बोलता आपणाशी!
कधी आपणा सर्व पिंडात शोधी
कधी पाहतो आत्मरुपात सारे
कधी मोजीतो आपणाला अनंते
अणूरूप होती जिथे सूर्य, तारे
टळेना अहंकार सध्या कृतीचा
गळेना महापुच्छ स्वार्थी स्मृतीचे
कधी घेतसे सोंग ते सत्य वाटे!
कधी सत्य ते वाटते सोंग साचे!
कधी संयमी, संशयात्मा, विरागी
कधी आततायी, कधी मक्तकामी
असा मी..तसा मी..कसा मी कळेना;
स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी!
विंदा करंदीकरांची ही कविता वाचली आणि अंतर्मुख व्हायला झाले की, खरंच असा मी तसा मी कसा मी कळेना? विंदा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते! वैचारीक तत्वज्ञानाची सखोल बैठक, अनुभूती होती. अनेक कविता त्यांनी लिहिल्या. प्रसिद्धिच्या झोतात ते होते. तरीही शेवटी आपण एक मनुष्यप्राणी! त्याला भावभावना आहेत. सामाजिक प्राणी आहे. समाजात वावरत असताना अनेक मुखवटे घेवून वावरतो. मग प्रश्न पडतो की, मूळ खरा मी कसा? खरी मी कशी? आणि आजच्या तर स्वार्थी युगात ही कविता फारच लागू पडते. २४ ओळींची कविता; पण गूढ असा जीवन भावार्थ लपलेला आहे.
समाजात वावरत असताना येणाऱ्या सुखदुःखाचे अनुभव त्यातून खूप काही शिकायला मिळते. स्वतःच्या स्वार्थानुसार जवळ व दूर जाणारे आप्त स्वजन पाहिले की प्रश्न पडतोच. एवढा प्रपंच थाट केला तो कशासाठी? मग कसा मी, कशी मी अशाच आशयाची आपल्याला तंतोतंत लागू पडणारी कविता मनाचा वेध घेते आणि भावते.
स्वतः विंदांनी म्हटले आहे, ‘आत्मज्ञान सर्वात श्रेष्ठ'! अनेक शास्त्रांच ज्ञान घेतले तरी आत्मज्ञान कठीण आहे. मी माझा शोध घेतला, माझ्या मनामध्ये डोकावून पाहिले तर परस्परविरोधी गोष्टी दिसल्या. मी कोण? ठरविणे कठीण होऊन जाते. अशाच आशयाची व माझ्या सर्व कवितांची पार्श्वभूमीला लागू पडणारी ही कविता असा मी, तसा मी कसा मी कळेना..
कवितेची सुरवात कधी ह्या प्रश्नार्थक शब्दांने सुरवात होते अन् जीवनाच्या गूढतेत, आपल्या अस्तित्वाचा प्रश्न कायम मनात रुंजी घालतो. विंदांनी त्यांच्या लेखनात सामाजिकता, वास्तवता आणण्याचा प्रयत्न केला.त्यातील ही एक कविता
कधी येतसे क्षुद्रता कस्पटाची
कधी वाढता वाढतो व्योम व्यापी
कधी धावतो विश्व चुंबावयाला
कधी आपणास स्वहस्तेच शापी
मानवी जीवन स्वभावाचे कंगोरे अधोरेखित होतात.आपल्या कार्याने कधी कधी सर्व यश पादाक्रांत करतो की काय अशी एकीकडे स्थिती, परोगामीचा आनंद, अहंकार तर कधी दुसऱ्याच क्षणी कर्तव्यहीन, स्वतःस क्षुद्र, कमी लेखू लागतो. आपण सर्व स्थितीस जवाबदार आहोत असे समजून स्वतःला कमी लेखतो व एक प्रकारे स्वतःच स्वतःला शापित करतो. द्विधा मनस्थिती, चंचलता दिसून येते.
कधी याचितो
कधी ध्येयाने...
ध्येयाने भारावून जावून अहोरात्र कष्ट करून एक प्रकारे काळालाही मागे टाकत स्वप्नपूर्ती करतो, सुखाच्या सरी बरसण्याचा आनंद घेतो. तरी कधी एवढा लाचार होतो.. मृत्यूही येत नाही. मृत्यूची भीक नियतीकडे मागावी लागते. दयनीय अवस्था होते. मानवी अवस्था क्षणांत आसमंत ठेंगणे अन् क्षणात मातीत मिळणे. आनंद-दुःख लपाछपी चालू होते. विंदानी जीवनसत्य खूपच सहजतेने कवितेत मांडले आहे.
येणाऱ्या परिस्थिती,प्रसंगानुरूप भावविश्व उलगडते. क्षणात गूढ, शांत, गंभीर जणू काही आत्मप्रकाश अंतर्मनात डोकावला आहे. ज्याप्रमाणे सागर जोराने गर्जतो त्याचप्रमाणे आपण (मी) सर्व शक्ती, ताकदीने गर्जतो, लढतो. विंदांनी रूपक समर्पकपणे वापरले आहे. कधी गर्जतो सागराच्या बळाने तर दुसऱ्याच क्षणी पुन्हा दीनवाणा होतो. गर्जना तर दूरच बोलतानाही कापतो. स्वबळावर उभे राहता येत नाही अशी दयनीय अवस्था! मग मी नक्की कसा? काही वेळा तर कर्तृत्वाचा एवढा अहंकार की, जिथे सूर्य, तारे अणूसमान म्हणजेच क्षुद्र वाटतात. स्वतःच्या साध्या कृतीच्या यशाला मोठे मानून कधी अनंतात स्वतःला मानतात. नंतर सत्यप्रचिती येवून आत्मपरीक्षण! स्वार्थी आठवणींचा अहंभाव गळत नाही. मुखवटे घेतलेले सोंग सत्य वाटते. पुढील पद्यपंक्तीत जीवनसत्य सांगितले आहे. कधी सत्य ते वाटते ते सोंग संशयी, विश्वास न ठेवणारा, प्रत्येक गोष्टीत दोष काढणारा, आततायी स्वभाव अशा अनेक स्वभावानी वेढलेला मी नेमका कळेन. माझा तळ मलाच सापडेना. कवितेची शेवटची ओळ मात्र निःशब्द करते व मी, तुम्ही आपण सर्वच ह्या ठिकाणी असल्याचे जाणवतेच...
स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी
विशेषतः स्त्री मनाला हे जास्त भावेल. काळ जरी बदलला तरी अजूनही ही परिस्थिती पहावयास मिळतेच. स्वतःच्या घरी दूरची पाहुणी मी...
(सर्वस्व तुजला वाहुनी माझ्या घरी मी पाहुणी -स्त्री भावविश्व मांडणारी विंदाची एक वेगळी कविताही आहे.) -सौ.ऋतुजा रविंद्र गवस, मुख्याध्यापिका, जिजाई बालमंदिर, ठाणे