हंटर-डे

बलात्काराचा, लैंगिक अत्याचाराचा आरोप शंभर टक्के सिद्ध झालेल्या नराधमाला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेल्यानंतर जेलमधील उघड्या जागेवर आणून चाबकाने चांगले फोडून काढावे आणि या कृत्याचे प्रक्षेपण आणि पुनर्प्रक्षेपण सर्व बातम्यांमधून दिवसभर प्रसारित करावे. बलात्कारी आरोपींच्या वेदनामय ओरडण्यामुळे-विव्हळण्यामुळे समाजातील वासनांध नजरांमधे निदान भितीची एक तरी लहर उमटेल हे नक्की.

निसर्ग-निर्मित वादळांना जशी विविध नांवे दिली जातात, तशीच विकृत मानवी प्रवृत्ति निर्मित आपत्तींना ही नांवे दिली जातात...जसे की निर्भया कांड..अभयाकांड..अजूनही काही नांवे ठरवून ठेवावीत, कारण ही मानव निर्मित वादळे सहजासहजी थोपवता येणार नाहीत. कधी कुठल्या घरात या वादळामुळे पडझड होईल ते सांगता येणार नाही. उपलब्ध आकडेवारीनुसार भारतात दररोज जवळपास ९० बलात्काराच्या घटना घडतात...त्यापैकी अनेक घटनांमधे ओळख पटू नये म्हणून पीडितांची हत्या करण्यात येते असे वाचनात आले आणि मन सुन्न झाले. अर्थात वरील आकडेवारी ‘उजेडात' आलेल्या घटनांची आहे...अंधारात लपलेल्या-आवाज दाबलेल्या घटनांची संख्या किती असेल कोणास ठाऊक? जास्तच असेल...कारण सगळीच काळी कृत्ये प्रकाशात येत नसतात हे आपण सगळेच जाणतो.

लैंगिक अत्याचारासारखा घृणास्पद गुन्हा घडला की शासन नेहेमीच ठोस पावले उचलण्याचे व आरोपीला ‘कठोरातील कठोर' शिक्षा म्हणजे फाशी देण्याचे आश्वासन देत असते...आणि एखादे वेळी त्याची अंमलबजावणी  होतेसुद्धा. पण  या ‘कठोरातल्या कठोर' शिक्षेचा योग्य तो प्रभाव जनमानसावर पडत नाही असे आत्तापर्यंतचा अनुभव सांगतो. हे कटू सत्य समजून घेऊन त्यानुसार पावले उचलणे आता गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी सौदी अरेबियामधील एक video पहाण्यात आला होता. त्यात सात बलात्का-यांची मुंडकी एका पाठोपाठ एक छाटली गेली आणि त्या कृत्याचा video  viral केला गेला, जेणेकरुन समाजामधे त्या शिक्षेची जरब बसावी...दहशत निर्माण व्हावी.  

हा video पहाताना  माझ्या छातीत धडधडू लागले...हातापायांत कापरे भरले. दीड मिनिटांचा हा video मी जेमतेम पंधरा सेकंदच कसाबसा पाहिला. असाच अनुभव हा video पहाताना प्रत्येकाला येईल यात शंका नाही. (हा video खरा आहे की नाही याबद्दल शंका यावी इतका तो भयावह आहे)

आपल्याकडे अगदी कठोरातील कठोर गणली जाणारी शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा. दिल्लीतील शाळकरी चोप्रा भावंडाचे ‘अपहरण-बलात्कार-हत्या' या केस मधले दोन आरोपी रंगा-बिल्ला यांना तसेच ‘निर्भया हत्याकांड'मधील चार आरोपींना फासावर लटकवले गेले. मावळ तालुक्यातील एका लहानगीच्या बलात्कार व हत्येच्या केसमधील आरोपीला अगदी अलिकडे फाशीची सजा सुनावण्यात आली. (अजून दिली नाही ती गोष्ट वेगळी!) पण या प्रकारच्या गुन्ह्यांची चढती भाजणी हे दर्शवते की जी शिक्षा (मग अगदी ती फाशीची का असेना) गुपचुप चार भिंतींआड दिली जाते....तिचा समाजमनावर काडीचाही परिणाम होत नाही.

असा निंदनीय गुन्हा घडल्यावर सुरुवातीला जनक्षोभ उसळतो आणि त्या भावनेच्या भरात निषेध मोर्चे..मेणबत्ती मोर्चे...रस्ता-रेल रोको आंदोलन वगैरे केले जाते. यामधे ब-याचदा निरपराध लोकांनाच त्रास जास्त होतो. थोड्याच दिवसांत सर्व काही आलबेल होते...आणि पीडितेचे कुटुंब सोडले तर बाकीचे आपण सगळे नेहेमीच्या उत्साहाने येऊ घातलेल्या सणांच्या तयारीला लागतो. त्यानंतर कालानंतराने आरोपीला फाशीची शिक्षा किंवा जन्मठेपेची शिक्षा झालीच, तरी ती एक बातमी म्हणून ऐकली जाते-वाचली जाते-काही दिवस चघळली जाते आणि नंतर तिचा चोथा होऊन ती आपल्या जीवन-चौकटीतून बाहेर फेकली जाते...आणि मग सर्व काही शांत होऊन जाते...इतके की जणू काही असे काही घडलेच नव्हते. कटु असले तरी हेच सत्य आहे. समाजातील निर्ढावलेल्या विकृत मनांना तर काडीचाही फरक पडत नाही.एखादा नराधम जेव्हा पकडला जातो.. तेव्हा त्याच्यासारखे अनेक नराधम बाहेर मोकाट फिरत असतात...तसाच गुन्हा करायची संधी शोधत असतात. म्हणूनच तर अशा घृणास्पद घटनांना आळा बसत नाही. याचा अर्थ असा नाही की या समाजकंटकांना जरब बसावी म्हणून आरोपीला भर चौकातच फाशी द्यावी. भारतामधे हे कदापि शक्य होणार नाही हेही खरे. आणि म्हणूनच एक दुसरा आडमार्ग सुचवावासा वाटतो...जो काही जणांना कदाचित अमानवी-क्रुर वाटू शकेल. कारण परदुःख नेहेमीच शीतल असते. पण क्षणभर या पीडित मुलींच्या जागी स्वतःला...स्वतःच्या मुलीला कल्पून पहावे...चित्र आपोआप स्पष्ट होईल.

बलात्काराचा, लैंगिक अत्याचाराचा आरोप शंभर टक्के सिद्ध झालेल्या नराधमाला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेल्यानंतर जेलमधील उघड्या जागेवर आणून चाबकाने चांगले फोडून काढावे आणि या कृत्याचे प्रक्षेपण आणि पुनर्प्रक्षेपण सर्व बातम्यांमधून दिवसभर प्रसारित करावे. बलात्कारी आरोपींच्या वेदनामय ओरडण्यामुळे-विव्हळण्यामुळे समाजातील वासनांध नजरांमधे निदान भितीची एक तरी लहर उमटेल हे नक्की. हे दृश्य पाहून वयात येऊ घातलेल्या कुमारांना...वयात आलेल्या तरुणाईला...या निर्घृण कृत्याचे गांभीर्य-त्याचे भोगायला लागणारे दुष्परिणाम  हे ‘याचि देही याचि डोळा' पहायला मिळतील. तसेच लहान शाळकरी मुलग्यांना वेळीच (संस्कारक्षम वयात) हे समजेल की मुलींना त्रास दिला किंवा त्यांच्याशी वाईट वागले तर अशी भयानक शिक्षा होते. तूर्तास त्यांना इतके कळले तरी खूप झाले.शिवाय आरोपीलाही समजेल की मरणप्राय वेदना म्हणजे काय! महिला दिना निमित्ताने हा चाबुक-सोहळा पुनर्प्रक्षेपित करता येईल. दरवर्षी याची उजळणी झाल्यामुळे या गुन्ह्याबद्दलची भितीदायक आठवण समाजाच्या मेंदूमधे कोरली जाईल. कारण आपण जे ऐकतो-वाचतो त्यापेक्षा जे उघड्या डोळ्यांनी पहातो त्याची नोंद मेंदू लवकर घेतो हे सिद्ध झाले आहे. शिवाय माणसाला पटकन येणा-या मृत्यूपेक्षा मरणप्राय वेदनांची भिती जास्त वाटते. म्हणूनच आता असे वाटू लागले आहे की फादर्स-डे/मदर्स-डे/फ्रेंडशीप-डे बरोबरच हंटर-डे साजरा करायची वेळ आलेली आहे. पण त्यामुळे बलात्कार-लैंगिक अत्याचार ‘पूर्णपणे' बंद होतील..? तर नाही. पण ब-याच प्रमाणात अशा विकृत प्रवृत्तींना आळा बसेल असे मात्र वाटते.

या सोबतच असे ही वाटते, की मोबाईलवर सहज म्हणजे एका click वर उपलब्ध असलेल्या  porn sights/अश्लिल video किंवा films यांबद्दल शासनाने गांभीर्यपूर्वक विचार करावा व त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस पावले उचलावीत. सेन्सार बोर्डनेही अधिक सजग व कठोर होण्याची गरज आहे. कथेची गरज किंवा एखाद्या प्रसंगाची गरज म्हणून अश्लिल-बिभत्स दृश्ये दाखवली जातात. पूर्वी झाडांच्या...दोन फुलांच्या किंवा पक्ष्यांच्या माध्यमातून प्रेम सूचित केले जायचे. आता प्रेमासाठी ‘बेड' हे माध्यम व प्रमाणाबाहेरची शारिरिक जवळीक लागतेच लागते. याचा कळत-नकळत जनमानसावर वाईट परिणाम होतोय आणि त्याची फळे भोगायला लागतायत समाजातील निरपराध महिलांना...निष्पाप मुलींना...अजाण चिमुरड्यांना, ज्यात मोठ्या प्रमाणात बालिका आहेत...आणि काही प्रमाणात बालकही आहेत.

या आठवडाभरातील कोलकत्ता-बदलापूर-अंबरनाथ- लातूर-कोल्हापूर-नागपूर-नाशिक-पुणे-सांगली येथील बलात्काराच्या/लैंगिक अत्याचाराच्या घटना प्रकाशात आल्यानंतर आता महिला सुरक्षिततेच्या नवीन प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या जातील. शाळा-कॉलेजेस-रेल्वे-रस्ते-मॉल्स सर्वत्र CCTV चे जाळे पसरवण्यात येईल. अशा घटना घडू नयेत यासाठी जरुर ती सर्व खबरदारी शासन आता घेईलच घेईल...पण ते पुरेसे असेल का?

काही अनुत्तरीत प्रश्न आहेत, जसे की...
१.पोलिसांवर महिलांनी किती अवलंबून रहावे?
२.ज्युडो-कराटे शिकून गँग-रेप टाळता येईल का?
३.महिला डॉक्टरने हॉस्पिटलमधे स्वसंरक्षणासाठी आपल्या ॲप्रनच्या खिशात ‘पेपर स्प्रे' ठेवणे अपेक्षित आहे का?  
४.महिलांनी-तरुण मुलींनी घराबाहेर पडताना पर्समधे एखादे छोटे हत्यार किंवा लाल तिखट बाळगणे अपेक्षित आहे का?
५.समाजातील या विकृतींची पुसटशीही जाणीव नसणा-या...ओळखीतल्या किंवा-अनोळखी पुरुषांना दादा-काका-मामा-आजोबा म्हणणा-या निरागस-निष्पाप बालिकांनी स्वसंरक्षण कसे करावे?

एका बाजुला शालेय लैंगिक शिक्षण-समाजप्रबोधन-मुल्य व्यवस्थापन-संस्कारवर्ग-समुपदेशन-या संबंधीची चर्चासत्रे असे सर्व सुरु राहिलंच. पण या मार्गाने समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचता येईल का? खरंच किती जणांना मनापासून असे वाटते की हे सर्व मार्ग समाजकंटकांचे मनपरिवर्तन घडवण्यासाठी पुरेसे आहेत?

आजच्या घडीला तरी ‘मवाळ आणि जहाल' उपाययोजनांची युती  झाल्याखेरीज समाजामधे आपल्याला अपेक्षित असलेला बदल घडेल असे वाटत नाही. महिलांनी घाबरत व मनामधे कायम भिती बाळगत  जगण्यापेक्षा शासनाने समाजकंटकांच्या मनात या गुन्ह्यांच्या परिणामांबद्दल भय खरंतर दहशत निर्माण करणे जास्त गरजेचे नाही का?
-संगीता पाटकर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

जावे विंदांच्या कवितांच्या गावा.....