नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा
खड्डे बुजवण्यासाठी ४० महिन्यात ४० कोटींचा खर्च
नवीन पनवेल : पनवेल महापालिकेने रस्त्यातील खड्डे बुजवण्यासाठी ४० महिन्यात तब्बल ४० कोटी ५८ लाख ४१ हजार २५७ रुपये खर्च केल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते दीपक कोळवणकर यांनी सदर माहिती दिली. सदरचा खर्च खड्ड्यांसाठी की ठेकेदारासाठी केला आहे? असा प्रश्न दीपक कोळवणकर यांनी केला आहे.
पनवेल महापालिका हद्दीतील रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. ४० कोटी खर्च करुन देखील बहुतांशी रस्ते खड्ड्यातच आहेत. त्यामुळे केलेला खर्च पाण्यात गेला असल्याचे बोलले जात आहे. या पैशातून ठेकेदाराचे चांगभलं झाल्याचा आरोप केला जात आहे. १ एप्रिल २०२१ ते ३१ जुलै २०२४ पर्यंत पनवेल महापालिकेने पनवेल, नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर या ठिकाणचे खड्डे बुजवण्यासाठी ४० कोटी ५८ लाख ४१ हजार २५७ रुपये खर्च केले आहेत. १ एप्रिल २०२१ ते ३१ जुलै २०२२ पर्यंत ५ कोटी ६९ लाख ३७ हजार ६०५ रुपये खड्ड्यांवर खर्च केले. तर १ ऑगस्ट २०२२ ते १ एप्रिल २०२३ पर्यंत खड्ड्यांवर १६ कोटी ९ लाख ९६ हजार ३७३ रुपये खर्च करण्यात आले. २ एप्रिल २०२३ ते ३१ जुलै २०२४ पर्यंत सर्वाधिक १८ कोटी १९ लाख ७ हजार २६९ रुपये खड्ड्यांवर खर्च करण्यात आले. कोट्यवधी रुपये खर्च करुन देखील खड्ड्यांची परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसत आहे. त्यामुळे महापालिकेने नागरिकांच्या कररुपी पैशाची खड्ड्यांवर आणि ठेकेदारावर उधळण केल्याचे बोलले जात आहे. पनवेल महापालिका हद्दीत खारघर, नवीन पनवेल, कामोठे, पनवेल आदि परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. एप्रिल २०२३ ते जुलै २०२४ पर्यंत खारघरमध्ये सर्वाधिक ६ कोटी ७१ लाख ७६ हजार रुपये खड्ड्यांवर खर्च करण्यात आले. याच १५ महिन्यात पनवेल मध्ये ४ कोटी २७ लाख ३० हजार रुपये, नवीन पनवेल मध्ये २ कोटी ५ लाख ९६ हजार रुपये, कामोठेत २ कोटी ३७ लाख ९६ हजार रुपये तर कळंबोलीत ३ कोटी ३६ लाख ६ हजार रुपये खड्ड्यांवर खर्च करण्यात आले. मात्र, तरीदेखील येथील रस्त्यांवर खड्डेच खड्डे दिसून येत आहेत. शास्त्रोक्त पध्दतीने खड्डे बुजवले नसल्याचा आरोप केला जात आहे.
त्यामुळे खड्ड्यांवरील पैसा गेला कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे.
पनवेल महापालिका हद्दीतील रस्त्यावरील खड्डे बुजवावे, अशी मागणी अनेक पक्षांनी महापालिकेकडे केली होती. मात्र, खड्डे भरणे म्हणजे केवळ थुकपट्टी असल्याचा आरोप केला जात आहे. कर भरुन देखील महापालिका हद्दीत नागरिकांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत आहे.