शाळा तुझ्या सोबत आहे

रक्षिताची कहाणी सामान्य मुलांसारखी नाही. रक्षिता लहान असतानाच तिची आई तिला सोडून देवाघरी निघून गेली. तिचा जन्म कर्नाटक राज्यात झाला होता. वडील महाराष्ट्रातले. आई गेली आणि रक्षिताला घेऊन तिचे वडील महाराष्ट्रात आले. पुढे ते व्यसनाच्या आहारी गेले. चार वर्षाच्या छोट्याशा बाळाचा भार पुढे घरातील वयोवृद्ध आजी-आजोबांनी आपल्या खांद्यावर घेतला. लहान बाळांचे आपण जसे सगळे लाड पुरवतो तसेच प्रेम रक्षिताचे आजी आजोबा रक्षितावर करू लागले. पण त्याला खूप मर्यादा होत्या.

रक्षिता. रक्षिता नवरंगे, तिला मी पहिल्यांदा गेल्या वर्षी इयत्ता पहिलीत पाहिले. बारीक शरीरयष्टीची, सावळ्या रंगाची, दोन मिनिटे सुद्धा स्थिर आणि शांत एका जागेवर कधीच न बसणारी. तिच्या डोळ्यात नेहमी उत्सुकतेचा धबधबा ओसंडून वहात असायचा. तोंडाने मात्र ती खूप कमी बोलायची. कधी फळ्याजवळ, तर कधी टेबलवर, तर कधी स्वतःचे दप्तर उघडून उगीचच त्यात मान घालणारी, तर कधी सर्वात पाठीमागे बसलेल्या मुली शेजारी जाऊन गप्पा मारणारी किंवा त्या मुलीची एखादी वस्तू तिच्या नकळत आपल्या हातात घेणारी आणि त्या वस्तूबरोबर खेळणारी, अशी ही रक्षिता. अखंड पहिलीच्या वर्षात रक्षिताने कधी काही वाचले नाही. मी काही सांगितलेले लिहिले नाही. कधी बडबड गीत म्हणून दाखवले नाही. मला कधी गोष्ट सांगून दाखवली नाही. सगळ्या मुलांना जवळ बोलवले की रक्षिता धावत यायची. पण बोलायची काहीच नाही. चेहऱ्यावर मात्र हसू असायचे. रक्षिताच्या निरागस हसण्यामुळे तिला पहिलीतल्या मुलांसारखे लिहिता वाचता येत नाही याच्याकडे माझे दुर्लक्ष व्हायचे. पहिलीमध्ये रक्षिताच्या वर्गात एकूण तिच्यासह सात मुली होत्या पण त्यामध्ये रक्षिताची एकही जिवाभावाची मैत्रीण नव्हती एकटीच असायची ती दुपारच्या जेवणाच्या वेळी सुद्धा एकटीच तुला खेळायलासुद्धा कोणी सोबत घेत नव्हते. तिच्यासोबत तिचे हसू मात्र होते. रक्षिताकडे पाहताच मनामध्ये विचार यायचे, बहुतेक शाळेमध्ये असेपर्यंत ही लिहायला-वाचायला शिकणार नाही. अध्ययन अक्षम म्हणूनच ती शाळेतून बाहेर पडणार. शाळेने मला काय दिलं? हा प्रश्न भविष्यात चुकून रक्षिताच्या मनात आला तर त्याचे उत्तर काय असेल? याचा विचार मी करायचो. पण पुन्हा तिचा हसरा चेहरा बघून एकाच गोष्टीचे समाधान वाटायचे, शाळेत रक्षिता आनंदी आहे.

रक्षिताची कहाणी सामान्य मुलांसारखी नाही. रक्षिता लहान असतानाच तिची आई तिला सोडून देवाघरी निघून गेली. तिचा जन्म कर्नाटक राज्यात झाला होता. वडील महाराष्ट्रातले. आई गेली आणि रक्षिताला घेऊन तिचे वडील महाराष्ट्रात आले. पुढे ते व्यसनाच्या आहारी गेले. चार वर्षाच्या छोट्याशा बाळाचा भार पुढे घरातील वयोवृद्ध आजी-आजोबांनी आपल्या खांद्यावर घेतला. लहान बाळांचे आपण जसे सगळे लाड पुरवतो तसेच प्रेम रक्षिताचे आजी आजोबा रक्षितावर करू लागले. पण त्याला खूप मर्यादा होत्या, आर्थिक पाठबळाच्या. पैशाशिवाय जे जे करता येईल ते सगळे तिच्या आजी आजोबांनी तिच्यासाठी केले. पण इतर मुला-मुलींना जसे कपडे मिळतात, खेळणी मिळतात, खाऊ मिळतो, शाळेतल्या विविध वस्तू मिळतात त्यातले काहीच रक्षिताला कधीच मिळाले नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आई-वडिलांचे प्रेम आणि संस्कार यापासून ती नेहमीच दूर राहिली. लहान मुलांच्या वाढीसाठी जे पोषक आणि सकारात्मक वातावरण घरात लागते ते तिला कधी मिळालेच नाही. जे घरातून मिळत नाही ते रक्षिताने बाहेरून मिळवायचा चुकीचा मार्ग स्वीकारला आणि त्याचा परिणाम म्हणजे तिला कोणी मैत्रीणच मिळाले नाही सगळीकडे चर्चा व्हायची ती म्हणजे रक्षिताच्या वाईट गुणांची. या नकारात्मक वातावरणाचा परिणाम रक्षिताच्या शिक्षणावर होऊ लागला. ती शाळेत यायची. बसायची. हसायची..पण शिकायची काहीच नाही.

रक्षिताचे घर शाळेपासून दीड दोन किलोमीटर अंतरावर होते. मध्ये छोटीशी नदी आणि नदीवर छोटासा पूल. रक्षिताच्या बाई रोज त्यांच्या गाडीवर तिला शाळेत घेऊन यायच्या. जाताना पुलाजवळ सोडायच्या. रक्षिता पुलाच्या दुसऱ्या टोकाला सुखरूप जाईपर्यंत तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बसायच्या. पलीकडे पोहोचली की रक्षिता पाठीमागे वळायची आणि हात हलवून, तुम्ही आता जावा. असे म्हणायची. कधी तिचे वयस्कर आजोबा तिला शाळेत घेऊन यायचे. वर्षभर असा रक्षिताचा प्रवास सुरू होता आणि शाळेतील फक्त उपस्थिती वाढत होती.

पुढे पुढे मी रक्षिताला प्रश्न विचारायचे सोडून दिले. कारण ती बोलायचीच नाही. या जून महिन्यात ती दुसरीला आली. माझ्या दोन भेटीमध्ये मी रक्षिताला कोणताच प्रश्न विचारला नाही. तिची वाचनाची प्रगती बघितली नाही. कारण ती झालीच नसेल असा माझा समज झाला होता. मी फक्त तिचे हसू मनात साठवायचो. काल शाळेत आनंददायी शनिवार होता. दप्तराशिवाय मुले शाळेत आली होती. म्हणून ती अजून जास्त आनंदी वाटत होती. त्यांचे जेवण झाले आणि मी दुसरीच्या मुलांना फळ्याजवळ बोलावले. नेहमीप्रमाणे सगळ्यात आधी माझ्याजवळ रक्षिता येऊन उभी राहिली. मग उरलेल्या सात मुली आल्या. त्यांच्याकडे कोणाकडेच वही, पुस्तक, पाटी यातले काहीच नव्हते. त्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती कशी बघायची हा प्रश्न माझ्या मनात होताच. मी फळ्यावर शब्द लिहिले, आई, गवत, माकड, कासव, तर, पेटी, गार, वजन, मामा, मोती'. प्रत्येक मुलाला फळ्याजवळ बोलवून प्रत्येक शब्दाचे वाचन करून घेतले. पहिल्या रांगेत बसलेल्या चार मुलींनी छान वाचन केले. दुसऱ्या रांगेत पहिल्या नंबरला रक्षिता बसली होती. तिचा नंबर येताच नेहमीप्रमाणे हसत ती उभी राहिली. शांतपणे जागेवर स्थिर उभी राहून रक्षिता माझ्याकडे बघू लागली आणि मी तिच्या डोळ्यात पाहत असतानाच माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले,  रक्षिता, तू वाचशील? रक्षिता विजेसारखी  माझ्या जवळ आली. तिने माझ्या हातातली पट्टी घेतली आणि एकामागून एक दहा शब्दांचे रक्षिताने सुंदर वाचन केले. पहिलीत संपूर्ण वर्षभर एकही अक्षर न वाचणारी रक्षिता दुसरीत ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दिवशी उत्तम प्रकारे वाचत होती. ही जादू आहे की स्वप्न आहे हे मला क्षणभर समजले नाही. मग मी पुन्हा रक्षिताला तेच शब्द वाचायला सांगितले. रक्षिताने एका दमात दहा शब्द वाचले. दुसरीतल्या मुलांची वाचन क्षमता तपासल्यानंतर त्यांची अभिव्यक्ती क्षमता तपासावी म्हणून अजून एक आव्हान मुलांसमोर ठेवले. त्या मुलांना सांगितले, ठप्रत्येक मुलांनी पुढे यायचे आणि फळ्यावर हे जे दहा शब्द लिहिले आहेत त्यातील जो शब्द तुम्हाला आवडतो त्या शब्दापुढे खडूने टिक करा. मग सर्व मुलांनी त्यांच्या आवडीच्या शब्दापुढे टिक केली. फक्त माकड' आणि तर', या दोन शब्दांना कोणीही हात लावला नाही. कोणाला आई आवडत होती. कोणाला मोती आवडत होते. तर कोणाला वजन आवडत होते. रक्षिताने तिच्या आवडीचा शब्द म्हणून गवत' या शब्दाची निवड केली होती. मग आव्हानाच्या पुढच्या टप्प्यावर मी गेलो आणि मुलांना म्हटले, आता तुम्ही जो शब्द निवडला आहे तो तुम्हाला का आवडतो याचे उत्तर द्या. आता मात्र वर्गात शांतता पसरली. पहिल्या रांगेतल्या चार मुलांपैकी एकही मूल मला अमुक शब्द का आवडला हे सांगू शकले नाही. आता पुन्हा दुसऱ्या रांगेतला पहिला नंबर रक्षिताचा होता. मला तिच्याकडून अपेक्षाच नव्हती. तिने वाचन केले तो क्षणच माझ्यासाठी आभाळ भेटीला येण्यासारखा होता. तिच्याकडून मला आता कोणतीच अपेक्षा नव्हती. तरीदेखील नेहमीप्रमाणे मी रक्षिताकडे पाहिले आणि विचारले, रक्षिता, तुला गवत का आवडते? क्षणाचाही विलंब न करता डोळ्यातले हसू तसेच ठेवून आत्मविश्वासाने रक्षिता म्हणाली, मला गवतात खेळायला आवडतं म्हणून मला गवत आवडतं. वर्गात माझ्या आवडीचा शब्द कोणता आहे व तो मला का आवडतो हे आत्मविश्वासाने फक्त रक्षितानेच सांगितले. जी मुले गेल्या वर्षी वाचत होती, लिहीत होती, गणिती क्रिया करत होती; ती मात्र आपल्या आवडीचे कारण सांगू शकली नाहीत आणि वर्षभर कधीही न बोलणारी, न लिहिणारी, न वाचणारी रक्षिता, मला गवत का आवडते हे हसत हसत आत्मविश्वासाने सांगत होती. तथाकथित लिहिणाऱ्या-वाचणाऱ्या मुलांच्या शंभर पावले पुढे रक्षिता चोर पावलाने गेली असेच मला वाटले.

एखादी जादूची कांडी फिरावी आणि वर्षानुवर्ष दुष्काळ पाहणाऱ्या माळरानावर अचानक धो-धो पाऊस पडावा व तिथे नंदनवन जन्माला यावे तसं काहीतरी रक्षिताच्या बाबतीत झाले आहे हे मला जाणवले. ती जादूची कांडी शोधण्यासाठी तिच्या बाईंना मी एकच प्रश्न विचारला, आज फक्त रक्षिताच का बोलली?  ती कधी बोलणारच नाही, असाच माझा समज झाला होता. रक्षिता कधी वाचणार नाही अशी समजूत माझ्या मनाची झाली होती. रक्षिताच्या बाई म्हणाल्या, माझ्या परीने मी रक्षिताची आई व्हायचा प्रयत्न केला, तिला जे जे हवं आहे आणि तिच्याजवळ जे जे नाही त्या  त्या सगळ्या वस्तू मी तिला दिल्या कपडे दिले, कपाळावर लावायला टिकली दिली, वही-पेन, पेन्सिल इतर मुलींच्याकडे जे आहे ते सगळे दिले आणि मग तिच्या अपेक्षांची पूर्तता झाल्यावर हळूहळू तीच्या अभ्यासाकडे तिच्या नकळत लक्ष दिले, हळूहळू रक्षिता अभ्यासात रमू लागली पण गेल्या वर्षभर तिची प्रगती मनासारखी झालीच नाही, पण दुसरीत आल्यावर तिच्यात  बदल जाणवायला लागला आहे, मलासुद्धा इतर मुलींच्या सारखे उत्तर सांगता आलं पाहिजे ही जाणीव तिच्या डोळ्यात आता मला दिसत आहे, आज मलाही खूप समाधान वाटलं, की माझी बाकी मुलं नाही बोलली, पण आज माझी रक्षिता बोलली.

अजूनही माझ्या डोळ्यापुढे हसरे डोळे असणारी आणि मला गवत का आवडते हे सांगणारी रक्षिता आहे. मनामध्ये प्रश्न आहेत,  जर रक्षिता शाळेत गेली नसती तर? रक्षिताच्या रूपाने कोणते व्यक्तिमत्व आपल्या समाजाला मिळाले असते? शाळाच नसती तर? रक्षिता मला कशी भेटली असती? पण वास्तव हे आहे, रक्षिता रोज शाळेत येते. तिच्या घराशेजारी असलेल्या पुलाखालून वाहणारे पाणी पाहून, आपलेही जीवन असे प्रवाही असावे असाच विचार तिच्या मनात येत असावा असे वाटते. काल मी पाहिले. तिचे आजोबा तिला न्यायला थोडे उशीरा आले, तर शाळा सुटल्यापासून आजोबा येईपर्यंत रक्षिता पुस्तक काढून मान खाली घालून चक्क वाचत होती. रक्षिताला एवढ्याच शुभेच्छा आहेत, खूप खूप वाच, शाळा तुझ्या सोबत आहे. -अमर घाटगे 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

गोमातेची पूजा करता..पण बैलाचे काय?