पुनर्विकासात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा

नवी मुंबई : नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर सुरु असलेल्या पुनर्विकास प्रकल्पातील विकासकांना काही राजकीय घटकांकडून वेगवेगळ्या प्रकारे धमकावण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. तसेच सोसायटीतील पदाधिकाऱ्यांवर देखील विविध प्रकारे दबाव टाकला जात आहे. त्यामुळे पुनर्विकासाच्या कामात बाधा आणणाऱ्या अशा अपप्रवृत्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ‘शिवसेना'च्या वतीने ‘नवी मुंबई'चे सह-पोलीस आयुक्त संजय येनपुरे तसेच नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे करण्यात आली.  

सध्या नवी मुंबई परिसरात अनेक सोसायट्यांच्या पुनर्विकासाचे प्रकल्प सुरु होत आहेत. तर काही सोसायट्यांचे काम प्रगतीपथावर आहे. काही राजकीय घटकांकडून त्यांच्याच बिल्डला काम देण्यासाठी, त्यांच्याकडूनच रेती, सिमेंट, स्टील, रेडिमिक्स माल घेण्यासाठी, त्यांचाच पीएमसी नेमण्यासाठी तसेच अमुक एक व्यक्तीला टेंडर देऊ नये यासाठी विकासकांना धमकावले जात आहे. तसेच सोसायटीतील पदाधिकाऱ्यांवरही विविध प्रकारे दबाव टाकला जात आहे. त्यामुळे सोसायटी पदाधिकारी आणि विकासकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाली आहे.  

या पार्श्वभूमीवर उपनेते विजय नाहटा आणि संपर्क प्रमुख किशोर पाटकर यांच्या नेतृत्वाखालील ‘शिवसेना'च्या शिष्टमंडळाने २ सप्टेंबर रोजी प्रभारी पोलीस आयुक्त संजय येनपुरे तसेच नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची भेट घेतली. तसेच पुनर्विकासाच्या कामात बाधा आणणाऱ्या अपप्रवृत्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी सह-पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांनी पुनर्विकास करणाऱ्या विकासकांना अथवा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर कुणी दबाव आणून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास विकासक आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्याांनी निसंकोच तक्रार करावी. संबंधितांविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.  

यावेळी ‘शिवसेना'च्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना देखील याबाबतचे निवेदन देऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी नवी मुंबईतील काही नागरी कामांचे निवेदनही डॉ. शिंदे यांना देण्यात आले. तसेच नगररचना विभागातील अधिकाऱ्यांवर एखाद्या राजकीय घटकाने दबाव टाकण्याचा किंवा फाईल अडवण्यासाठी संपर्क साधल्यास अशा व्यक्तींचे कॉल रेकॉर्ड करावेत आणि त्या फोन कॉल्सची रजिस्टरवर नोंद ठेवावी, अशी लेखी सूचनाही विजय नाहटा यांनी यावेळी केली.

‘शिवसेना'च्या शिष्टमंडळात उपजिल्हाप्रमुख अजित सावंत, रोहिदास पाटील, रामाशेठ वाघमारे, दिलीप घोडेकर, शहरप्रमुख विजय माने, दीपक सिंग, संतोष दळवी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 पाणी प्रश्नावर शिवसेना उपशहरप्रमुखाचे अर्धनग्न आंदोलन