नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा
कोपरखैरणे पोलिसांकडून ३५ फिर्यादींना मोबाईल फोन परत
नवी मुंबई : कोपरखैरणे पोलिसांनी आपल्या हद्दीतील चोरीस गेलेल्या आणि गहाळ झालेल्या ७ लाख रुपये किंमतीच्या ३५ मोबाईल फोनचा शोध घेऊन सदर मोबाईल फोन संबंधित तक्रारदारांंना परत केले. यावेळी हरवलेले आणि चोरीला गेलेले आपले मोबाईल फोन परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करत त्यांचे आभार मानले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या चोरीस गेलेल्या आणि गहाळ झालेल्या मोबाईल फोनच्या तक्रारींचा आढावा घेऊन त्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले होते. या पथकातील पोलीस शिपाई राहुल मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोपरखैरणे हद्दीतून चोरीस गेलेल्या तसेच गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा तांत्रिक तपास करुन भारतातील विविध राज्यातून एकूण ३५ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल फोनमध्ये १ आयफोनचा समावेश आहे. ज्या नागरिकांचे मोबाईल फोन होते, त्या नागरिकांना २८ ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना त्यांचे मोबाईल फोन सन्मानपूर्वक परत करण्यात आले. मोबाईल परत मिळालेल्या फिर्यादींनी समाधान व्यक्त करुन पोलिसांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.