नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा
लैंगिक अत्याचाराचे वाढते प्रकार रोखण्याची जबाबदारी
खारघर : गेल्या काही दिवसापासून महिला लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्याचे निदर्शनास येत आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नये याकरिता आपली सर्वांची जबाबदारी आहे. असे काही प्रकार निदर्शनास पोलिस मदतीसाठी ११२ आणि सायबर फ्रॉडसाठी १९३० क्रमांकाची हेल्पलाईन उपलब्ध आहे. नागरिकांनी या हेल्पलाईन विषयी माहिती माहिती देऊन त्याचा प्रसार नागरिकांमध्ये करावा. तसेच पोलीस प्रशासनाने सुरु केलेल्या व्हॉटस्ॲप चॅनलला शाळेतील शिक्षकांमार्फत सर्व विद्यार्थ्यांच्या फॉलो करा, अशा प्रकारचे जनजागृती अभियान खारघर पोलिसांकडून सुरु करण्यात आले आहे.
बदलापूर तसेच इतर काही ठिकाणी लैंगिक अत्याचाराचे प्रकार उघडकीस आल्यामुळे शाळा प्रशासन, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी खारघर पोलिसांच्या वतीने परिसरातील शाळेत सायबर सुरक्षा-गुन्हे प्रतिबंध, व्यसनमुक्ती आणि अंमली पदार्थ प्रतिबंध, आर्थिक फसवणूक आणि प्रतिबंधक उपाय, जेष्ठ नागरिक सुरक्षा-काळजी, मुली, महिला-बालकांची सुरक्षा आदि विषयावर माहितीपर जनजागृती अभियान सुरु करण्यात आले आहे. या जनजागृती अभियानाला शाळेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नवी मुंबई शहरातील वाढते सायबर गुन्हे आर्थिक गुन्हे, अंमली पदार्थ गुन्हे, महिला सुरक्षा संदर्भात गुन्ह्याला आळा घालण्यासाठी तसेच त्याबाबत नागिरकांमध्ये जनजागृती करण्यासाठी व्हॉटस्ॲप चॅनल सुरु करण्यात आले आहे. शाळेतील शिक्षकांमार्फत सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना माहिती देऊन व्हॉटस्ॲप चॅनलला फॉलो करा, अशा प्रकारची माहिती शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना दिली जात आहे.
दरम्यान, खारघर पोलिसांकडून २८ ऑगस्ट रोजी खारघर मधील हार्मोनी स्कुल आणि सेक्टर-१० मधील सुधागड शाळेत जनजागृतीपर व्याख्यान देण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग घागरे, महिला पोलीस कर्मचारी शितल कुंठे, दिपीका चव्हाण, आदिंनी मार्गदर्शन केले.
शाळेतील विद्यार्थी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा परिसरात सीसीटीव्ही अद्ययावत असावे. तसेच काही प्रकार घडल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, अशा प्रकारच्या सूचना शाळा प्रशासनाला दिल्या जात असून सर्व शाळांमध्ये सदर उपक्रम राबविण्याचा संकल्प आहे. -वैशाली गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक-खारघर पोलीस ठाणे.