नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा
घणसोली मॅकडोनाल्ड जवळील तरुणाच्या हत्येचा छडा
नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावरील घणसोली रेल्वे स्थानकालगत ४ ऑगस्ट रोजी पहाटेच्या झालेल्या सुमारास घडलेल्या सुशीलकुमार रामसजीवन बिंद (२५) या तरुणाच्या हत्या प्रकरणाची उकल करण्यात गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाला यश आले आहे. या हत्या प्रकरणात कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना गुन्हे शाखेने सदर हत्या प्रकरणात तळवळी गावातून समीर अमजीत शेख (२३) याला अटक केली आहे. आरोपी समीर शेख याने सुशीलकुमारला लुटण्याच्या उद्देशाने त्याच्या छातीत तीक्ष्ण हत्याराने भोसकून त्याची हत्या केल्याचे तपासात आढळून आल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी पत्रकार परिषदमध्ये दिली.
या घटनेतील मृत सुशीलकुमार मुळचा उत्तरप्रदेश राज्यातील असून तो १ ऑगस्ट रोजी मुलुंड येथे मावस भावाकडे आला होता. त्यानंतर तो ४ ऑगस्ट रोजी दुपारी तो कळवा येथे मोबाईल दुरुस्तीसाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी परतला नव्हता. मात्र, ५ ऑगस्ट रोजी सकाळी त्याचा मृतदेह ठाणे-बेलापूर मार्गावरील घणसोली येथील मॅवडोनाल्ड जवळ रस्त्यालगत बेवारसरित्या आढळून आला होता. रबाले एमआयडीसी पोलिसांनी सुशीलकुमार याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले असता, पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सुशीलकुमार याच्या छातीमध्ये टोकदार हत्याराने भोसकून त्याची हत्या केल्याचे आढळून आले होते.
त्यानंतर रबाले एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याचा शोध सुरु केला होता. त्याचप्रमाणे गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाकडून देखील समांतर तपास करण्यात येत होता. या तपासादरम्यान गुन्हे शाखेने कोपरखैरणे ते घणसोली रोड लगतच्या कंपनी मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. या तपासणीत मृत सुशीलकुमार पहाटेच्या सुमारास ठाणे-बेलापूर मार्गावरुन रबाले ते घणसोली रेल्वे स्टेशनच्या दिशेने पायी चालत जात असल्याचे निदर्शनास आले. तसेच घटनास्थळाजवळ खाली आणि वर अशा दोन लाईट असलेली एक संशयित मोटारसायकल उभी असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर १० मिनिटानंतर सदर मोटारसायकल घटनास्थळावरुन निघून गेल्याचे दिसून आले.
त्यावरुन गुन्हे शाखा मधील अधिकारी आणि अंमलदारांच्या ४ पथकांनी ठाणे-बेलापूर रोड, कोपरखैरणे, घणसोली या परिसरातील सुमारे १०० ते १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची १५ दिवस पडताळणी करुन संशयित मोटारसायकलचा शोध घेतला. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता, तळवली गावात राहणाऱ्या समीर अमजीत शेख याने सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी समीर शेख याला गुह्यात वापरलेल्या मोटारसायलसह ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याला अटक करण्यात आल्याचे अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी सांगितले.
लुटमारीच्या उद्देशाने हत्या...
दरम्यान, आरोपी समीर शेख याने सुशिलकुमार याला चाकुने भोसकल्यानंतर सुशीलकुमार याने जखमी अवस्थेत २ डिलीव्हरी बॉयना त्याला लुटल्याचे सांगितले होते. आरोपी समीर शेख याला गांजा आणि दारुचे व्यसन होते. त्यामुळे त्याला कुटुंबियांनी व्यसनमुक्तीसाठी आस्था फाऊंडेशन मध्ये ठेवले होते. तेथून बरा झाल्यानंतर २ महिन्यापूर्वी तो तळवळी येथे आला होता. मात्र, पुन्हा समीर शेख व्यसनाधीन झाल्याने त्याने व्यसनासाठी सुशीलकुमार याच्याजवळ असलेले पैसे आणि मोबाईल फोन लुटण्यासाठी त्याच्यावर चाकू हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज दीपक साकोरे यांनी व्यक्त केला आहे.
कोणताही पुरावा नसताना हत्या प्रकरणाची उकल...
या घटनेतील अज्ञात मारेकरीबाबत कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच मृत व्यक्ती मोबाईल फोन वापरत नसल्याने घटनेची निश्चित वेळ याची कुठल्याच प्रकारची माहिती नसताना गुन्हे शाखा कक्ष-१ चे पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बनकर, निलेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते, प्रशांत कुंभार आदिंच्या पथकाने गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.