नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेली बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला पोलीस कोठडी
कल्याण : बदलापूर मध्ये शाळेतील दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला २१ ऑगस्ट रोजी कल्याण कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी यायालयाने त्याला २६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकील अश्विनी भामरे पाटील यांनी पिडीतेची बाजू मांडली. विशेष महिला न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांच्या कोर्टात अक्षय शिंदे याला हजर करण्यात आले. तर बदलापूर आंदोलन प्रकरणात २२ आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना कल्याण लोहमार्ग न्यायालयात हजर केले.
२१ ऑगस्ट रोजी मोठ्या पोलीस बंदोबस्तात आरोपी अक्षय शिंदे याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी आरोपीला फाशी द्या, अशी मागणी बदलापूरकरांकडून केली जात होती. चिमुरड्या मुलींवर अत्याचाराच्या घटनेनंतर बदलापूर मधील पालक आणि नागरिकांचा रोष पाहता आरोपीवर हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था पाहता पोलिसांनी स्टेशन परिसरासह कल्याण न्यायालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
आरोपी अक्षय शिंदे याचे वकीलपत्र कुणीही घेऊ नये, असे आवाहन ‘कल्याण वकील संघटना'तर्फे करण्यात आले. ‘कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटना'च्या वतीने बैठक घेऊन सदरचा निर्णय घेण्यात आला. आम्ही वकील पत्र देणार नाही सरकारने त्यांचे वकील द्यावा, आम्ही आरोपीच्या विरुध्द लढणार, अशी भूमिका कल्याण न्यायालय मधील ‘वकील असोसिएशन'ने घेतली असल्याची माहिती ‘कल्याण बार असोसिएशन'चे अध्यक्ष प्रकाश जगताप यांनी दिली.
दुसरीकडे बदलापूर रेल रोको आणि आंदोलन प्रकरणात जमाव जमवणे, रेल रोको करणे, स्टेशन परिसरात तोडफोड तसेच पोलिसांवर दगडफेक यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेल्या २२ आंदोलनकर्त्यांना देखील २१ ऑगस्ट रोजी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले. यावेळी या आरोपींना न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. परंतु, या आंदोलनकर्त्यांना सोडवण्यासाठी कल्याण आणि बदलापूर ‘वकील संघटना'च्या वतीने कोणताही मोबदला न घेता त्यांना सोडविण्यासाठी न्यायालयात त्यांची बाजू मांडली.
२० ऑगस्ट रोजी रात्री उशिरा कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात ३०० पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनांमुळे रेल्वे प्रवास आणि परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात पुढील तपास सुरु ठेवला असून, आंदोलनातील इतर सहभागींचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात रेल्वे पोलीस आणि आंदोलनकर्त्यांच्या वकिलांमध्ये वाद झाला. पोलिसांनी दिरंगाई केली नसती तर आंदोलन झाले नसते. आंदोलनकर्त्यांच्या सह्या घेण्यासाठी वकील गेले असता रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी वकिलांशी अरेरावी केल्याचा आरोप वकिलांनी केला असून पोलिसांवर कायदेशीर कारवाई करा, आंदोलन कर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी या वकिलांनी केली आहे.